बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

स्वातंत्र्य व स्वराज्य

स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांच्या आतच गुरुजींनी जगाचा निरोप घेतला तो भग्न आशा आणि निराशेंत. गुरुजींनी स्वराज्याचे जे दिव्य स्वप्न पाहिले. ते अणुमात्रही प्रत्यक्षात अवतरले नाही. शेतकर्‍यांना, गरीबांना मी आश्वासने दिली त्यांना आता तोंड कसे दाखवूं या भावनेने सानेगुरुजी तडफडत होते. गुरुजींच्या शब्दांतच स्वराज्याचे शब्दबध्द केलेले चित्र.....

बिटिशांची सत्ता आपल्या देशात द्दढ झाल्यापासून आपले फायदे काय झाले ते मला तरी सांगता येत नाहीत. परंतु सहस्त्रावधी तोटे झाले ते पर्वताप्रमाणे डोळयासमोर उभे राहतात. आपण निःशस्त्र केले गेलो. आपले पौरुष मारले गेले. आपला आत्मा खच्ची करण्यात आला. आपण लुळे व बुळे झालो. सदासर्वदा सरकारच्या तोंडाकडे पाहणारे आपण झालो. आपली कर्तृत्वशक्ती गेली, आपले धैर्य गेले. पोलिस हा आपला राजा झाला. वाघाशीही झुंज घेणारे पोलिस पाहून भिऊ लागले. पोलिस हा परमेश्वर. तो मागेल ते द्यावे. तो म्हणेल तेथे यावे. आपण गाईहूनही गाय झालो. गायही पिळून पिळून शेवटच्या थेंबापर्यंत दूध काढणार्‍याला लाथ मारते. परंतु आपणात रामच उरला नाही. बस म्हटले की बसावे, ऊठ म्हटले की उठावे, अशी जनतेची स्थिती झाली. ब्रिटिशांच्या सत्तेने माणसांची मेंढरे केली. काँग्रेस मायमाऊलीने अवतार घेतला. तिने पुन्हा माणुसकी दिली. ब्रिटिश सत्तेमुळे माणसांची माणुसकी गेली. उद्योगधंदे सारे बुडाले, बुडविण्यात आले. जेथे सोन्याचा धूर निघे तेथे रडण्याचा सूर घरोघर निघू लागला. कोटयवधी लोक बेकार झाले. लाखो अर्धपोटी राहू लागले. बेकारी वाढली, त्याबरोबरच दुष्काळही वाढले. पूर्वी शंभर वर्षात एखादा दुष्काळ पडे तर आता दरसालच जणू दुष्काळ. दुष्काळात टिकाव धरणे कठीण होऊ लागले. लोकांमध्ये प्राणच उरले नाहीत. जरा पावसाने डोळे वटारले की जनतेचे डोळे पांढरे होतात. महिनाभर पाऊस न पडला तर लगेच आईबाप चार चार आण्यांत पोटचे गोळे मिशनरी लोकांना विकू लागतात. बेकारी, दुष्काळ, त्यांच्या बरोबरच नवीन नवीन व्यसने आणि नवीन नवीन रोगही आले. जुगार रूढ झाले. दारू गावोगाव झाली. प्लेग,  कॉलरा, इन्फ्लुएन्झा आले. भांडणे वाढली. आमच्यामध्ये भेद पाडण्यात आले. नोकरीशिवाय दुसरा उद्योगधंदा नसल्यामुळे हे भेद आणखीनच वाढले. हिंदू, मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्यास्पृश्य या सर्वांच्या मुळाशी पोटापाण्याचा प्रश्न आहे. तुला नोकरी की मला, तुझ्या लोकांना किती प्रमाणांत, माझ्या लोकांना किती प्रमाणांत, ह्याच गोष्टीला महत्त्व आले. कर्तृत्वाला वावच कोठे उरला नाही. असा हा राष्ट्राचा अंतर्बाह्य नाश या दिडशे वर्षात झाला. आणि स्वातंत्र्य पाहिजे ते मूठभर भांडवलवाल्यांचे नव्हे. खरे गोरगरीबांचे स्वातंत्र्य हवे. असे स्वातंत्र्य येईल तेव्हाच रोग हटतील, पोटभर खायला मिळेल, ज्ञान येईल, आनंद येईल असे गरिबांचे स्वातंत्र्य आणण्यासाठी एक काँग्रेस धडपडत आहे. बाकी इतर संस्थांचे गरिबांकडे लक्षही नाही. इतर संस्था वरिष्ठ वर्गांच्या, वरिष्ठ जातींच्या. कोटयवधी शेतकरी, लाखो कामकरी यांच्याकडे काँग्रेसचे लक्ष आहे, अधिकाधिक जात आहे. इतर संस्था धर्माच्या नावाने ओरडत आहेत. परंतु पहिली व्याख्या जी शिकविली पाहिजे ती म्हणजे अन्नब्रह्न. परंतु हा ओदनरूपी परमेष्ठी, हे अन्नब्रह्न सर्वांना नेऊन भेटवू असे कोणाला वाटते आहे? धर्माच्या वरवरच्या गप्पा काय कामाच्या? भगवान बुध्दांनी एकदा शिष्यांना सांगितले. ''जा आता दशदिशांत आणि प्रेमाचा उपदेश करा.'' शिष्य निघाले. काही शिष्यांना जवळच एका झाडाखाली एक मनुष्य आढळला. ते शिष्य त्याज्याजवळ गेले. आणि म्हणाला, ''म्हणे, अक्रोधाने क्रोध जिंकावा, जगाला प्रेम द्यावे' म्हण.'' तो म्हणेना. शिष्य म्हणाले, ''याला उचलून भगवान बुध्दाकडे नेऊ या'' त्यांनी त्याला उचलून बुध्दांकडे आणले. ते म्हणाले, ''भगवान, हा नास्तिक दिसतो. याला सूत्रे शिकवतो तर म्हणत नाही.'' कारुण्यसिंधू बुध्ददेवांनी त्या माणसाकडे पाहिले. ते शिष्यांना म्हणाले, ''घरात काही फळे असली तर त्याला आणू द्या. काही तरी त्याला आधी खायला द्या.'' शिष्यांना आश्चर्य वाटले. धर्मसूत्रे शिकविण्याऐवजी आधी हे खायला कसे देतात! परंतु त्यांनी सांगितल्याप्रमो केले.

 

पुढे जाण्यासाठी .......