शनिवार, ऑक्टोबंर 24, 2020
   
Text Size

जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता

भारताने लोकशाही शासन व्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाही जीवनपध्दतीचा स्वीकार केला. परंतु अनेक प्रकारच्या जाति-धर्मांनी आणि विषमतेने ग्रासलेल्या समाजांत लोकशाही कशी यशस्वी होणार? एकराष्ट्रीयत्वाची भावना, सामाजिक समता आणि एकसंध समाज ही लोकशाहीची अविभाज्य लक्षणे आहेत. यासाठीच गुरुजींना स्वराज्यात जातिधर्म-निरपेक्ष राष्ट्र व सामाजिक समता अत्यावश्यक वाटत होती. याबाबतची गुरूजींची मते येथे संकलित केली आहेत.....

भारत हे जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, म्हणून आपण घटनेने घोषवले. तुमच्या घरी तुमचा धर्म. राष्ट्रीय कारभारात तुम्ही मानव म्हणून आहात. मानवतेला धरून कायदे करताना कोणत्याही धर्माला आड येऊ देता कामा नये. भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य हवे. हिंदू भगिनींचे व मुस्लीम भगिनींचे घुंगट जायला हवेत. मुसलमानांनीही एकापेक्षा अधिक बायका करू नयेत. ते म्हणतील, ''आमच्या धर्मात हात घालता!'' तर त्यांना नम्रपणे सांगावे की, कृपा करून पाकिस्तानात जा. अरबस्तानात स्त्रियांची संख्या अधिक होती म्हणून पैगंबराने तथी सूट दिली. हे त्रिकालाबाधित कायदे नसतात. मानव्याची विटंबना नाही होता कामा. भारतातील स्त्री-मग ती कोणत्याही धर्माची असो, तिला आपण मुक्तच झालो असे वाटले पाहिजे. हिंदू कोड बिल, मुस्लीम कोड बिल, -असे न करता सर्वांना बंधनकारक अशा मानवतेचा कायदा करा. एकदम हे करणे बरे नाही असे वाटत असेल तर त्याचा प्रचार करावा. सरकारने जातिधर्मनिरपेक्ष वातावरतण उत्पन्न व्हावे म्हणून प्रचंड प्रचार करायला हवा. मानव म्हणून जगा, वागा - अशी प्रचाराची झोड हवी. तुर्कस्तानात केमालने या गोष्टी केल्या. मुस्लिम धर्मातील मानवतेला विरोधी गोष्टी त्यांनी फटक्यासरशी दूर केल्या. तो डगमगत नाही. हे खरे की, तुर्कस्तानातील क्रांतिकारक तरुण व तरुणी या गोष्टींचा कित्येक वर्षांपासून प्रचार करीत होत्या. भारतातील मुस्लिम बंधूंनी या प्रचारार्थ उठले पाहिजे. भारतातील सर्व जातीजमातींचे, सर्व धर्माचे, एक राष्ट्र केवळ घोषणांनी होणार नाही. सर्व जातीजमातींचे एकत्र जाणे-येणे, रोटी-बेटीचेही व्यवहार रूढ व्हायला पाहिजेत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य, हिंदु-मुसलमान त्याचप्रमाणे भिन्न भिन्न प्रान्तीयांचे एकत्र विवाह व्हायला पाहिजेत. जातिधर्मनिरपेक्ष राष्ट्र केवळ घटनेत शब्द घालून निर्माण होत नसते.

पंढरपूरच्या माझ्या उपासानंतर पू. आप्पासाहेबांनी मला एक महत्त्वाचे पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी भारतातील सर्व जाती-जमाती, सर्व धर्म यांच्यामध्ये रोटी-बेटी-भेटी व्यवहार सुरू व्हायला हवेत असे स्पष्ट मत मांडले होते. आर्थिक समतेचाही प्रचार व्हायला हवा, असेही त्या पत्रात लिहिले होते. आपण खर्‍या  अर्थाने अजून एक राष्ट्र नाही. एक राष्ट्र करायचे आहे. आज जी अमेरिका आहे ती युरोपातील अनेक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी बनली आहे. त्यांची मूळची राष्ट्रीयता महान अमेरिकन राष्ट्रीयतेत विलीन झाली. भारतात हे असे संमिश्रण करावयाचे आहे. भारतीय राष्ट्रीयतेला आकार यायचा आहे. भगीरथ काम आहे. ते क्षणात होणार नाही, हे खरे असले तरी त्या द्दष्टीने आमचे सारे उद्योग पाहिजेत. आमची वृत्तपत्रे, आमचे बोलपट, सरकारी व निमसरकारी सांस्कृतिक प्रचारक, आमच्या शाळा, महाशाळा, विद्यापीठें, देशातील अनेक संस्था या सर्वाचे उद्दिष्ट भारतातील ३३ कोटी लोकांचे असे प्राणमय राष्ट्र बनविणे, परस्परांचे भले घेणारे, परस्परांच्या संस्कृतीचा अभ्यास करणारे, एकत्र आणणारे, उठणारे, रोटी-बेटी-भेटी व्यवहार करणारे अशांचे एक खरेखुरे राष्ट्र बनविणे हे ध्येय पाहिजे. अलगपणा शिकवणे हा राष्ट्राचा व मानवतेचा भयंकर गुन्हा होय.

 

पुढे जाण्यासाठी .......