गुरुवार, डिसेंबर 03, 2020
   
Text Size

सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा

गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी सर्वोदयाचा नवा पंथ काढला पण गांधीजींवर अनन्यसाधारण निष्ठा असूनही साने गुरुजींनी सर्वोदयाचे तत्त्वज्ञा झिडकारले. ते कां याची उत्तर अत्यंत परखड शब्दांत गुरुजींनी दिलेली आहेत, त्याचा हा परिचय.....

आज सर्वोदय शब्द सर्वत्र उच्चारला जात आहे. महात्माजींच्या महाप्रयाणानंतर वर्ध्याला महात्माजींचे अनुयायी जमले व सर्वोदय समाजरचनेचे ध्येय त्यांनी उदघोषिले. ठिकठिकाणी सर्वोदय शाखा सुरू झाल्या. जयपूरला सर्वोदय प्रदर्शन भरले. धुले येथे पू. विनोबाजींनी महात्माजींचा प्रयाण-दिन ३० जानेवारी हा सर्वोदय-दिन म्हणून माना म्हणून परवा सांगितले. ते प्रवचनात म्हणाले ''सर्वांची हिते अविरोधी आहेत.'' परंतु सर्वांची न्याय्य हिते अविरोधी असू शकतील. कामगाराला खायला हवे. नि कारखानदारासही हवे. दोघांचे हित अविरोधी आहे आणि म्हणूनच दोघांना सारखेच द्या. उत्पन्नात थोडीफार तफावत चालेल. मालकाला लाखो रुपये फायदा देण्याची जरुरी नाही. परंतु ज्या समाजात असे होत असेल तेथे अविरोधी हिते कशी असणार? उदय म्हणजे उद्धार. गरिबाचा गरिबीतून उद्धार करण्यासाठी त्याला अधिक द्यायला हवे; मेहरबानी म्हणून नव्हे. त्याला देणे धर्म्य आहे. न्याय्य आहे, म्हणूनच; आणि श्रीमंताची विलासातून, श्रीमंतीतून मुक्तता करणे, त्याला गरिबीकडे आणणे यात त्याच्या आत्म्याचा उदय, त्याचा उद्धार. महात्माजी एकदा म्हणाले होते, ''ब्रिटिशांचे साम्राज्य नष्ट करण्यातच त्यांचा उद्धार आहे.'' त्याचप्रमाणे भांडवलशाही पध्दती नष्ट करण्यातच भांडवलदारांचा उद्धार आहे, तेव्हाच सर्वोदय होईल.

ब्रिटिश कंपन्या मागे म्हणाल्या, ''हिंदुस्थानात उद्या आम्हालाही समान हक्क द्या.'' गांधीजींनी लिहिले, ''बालभीम आणि सुदामदेव यांची बरोबरी कशी? बलभीमाचा खुराक कमी करायला हवा आणि सुदाम्याला अधिक द्यायला हवे.'' जो उपेक्षित आहे, ज्याला घर ना दार, ज्याच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, ज्याला पदोपदी ददात, त्याला अधिक देणे, व ज्याला गडगंज आहे त्याचे बरेचसे काढून घेणे म्हणजे समता. याला सर्वोदय म्हणतात. असे करावयाचे असेल तर समाजवाद हाच त्याला मार्ग आहे. परंतु काँग्रेस तो या देशात लौकर आणू इच्छित नाहीच, उलट ब्रह्मदेश आणीत असेल तर तेथील हिंदी भांडवलदारांना नि जमिनदारांना भरपूर मोबदला मिळाला पाहिजे असा हट्ट धरला जात आहे असे कानी येते. खरे असेल तर मान खाली घातली पाहिजे.

 

पुढे जाण्यासाठी .......