बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

ताईची भेट

''त्याच्यावर होतें कीं नाहीं तुझें प्रेम ? बोल. कबूल कर. त्याच्याबरोबर पळूनहि गेली असतीस. गुलगुल गोष्टी करीत त्याच्याजवळ बसस. होतें कीं नाहीं तुझें प्रेम त्याच्यावर ?''

तो तिला असें विचारायचा, छळायचा, मारायचा. तिला जीवन असह्य झालें. एका बाजूला ती जागा होती. ना आधार, ना विसांवा. लहान लिलीकडे बघून ती जीवन कंठी. तीहि भाऊ भाऊ म्हणायची. परंतु पित्याच्या देखत ती भाऊ भाऊ हांक मारीत नसे.

लिली तापानें फणफणत होती. ती आईच्या मांडीवर होती.
''भाऊ, आई, भाऊला बोलव. कोठें आहे भाऊ'' असें ती तप्त मुलगी विचारी. तेच्या नयनांतील पाणी उत्तर देई.

''देवा घरीं जा नि भाऊच्या पोटीं ये. तुला मग भाऊ मिळेल. तो तुला मग घेईल. हो लिले. येथें नाहीं भाऊ यायचा. येथें कोण त्याला येऊं देईल ? आणि तो तरी कोठें असेल तें देवालाच माहीत. त्याची काय स्थिती असेल तें आपल्याला कोठें आहे ठाऊक ?''

ताई लिलीजवळ बोलत बसे. लिली वांचेल असें वाटत नव्हतें.
''आज जरा अधिक आहे मुलीचें. तुम्ही घरींच रहा.''
''ऑफिसला गेलेंच पाहिजे. आणि ती वातांत भाऊ भाऊ म्हणते. मला नाहीं सहन होत. तें भाऊ भाऊ बंद होऊं दे.''

''आतां बंद व्हायला वेळ नाहीं.''
''मी येतोंच कचेरींतून.''

तो गेला ताई जेवली नाहीं. लिलीचीं शेवटची घटकापळें होतीं. आई मुलीला घेऊन बसली होती.

''लिले, बाळ, जा हो देवाघरी, आईलाहि बोलावणें पाठव. भाऊ भाऊ नको करुं. या जन्मीं नाही आतां तो भेटणार.''

ती मुलगी तडफडत होती. डोळे एखादेवेळेस स्थिर करी. तिला का भाऊ समोर दिसे ? आणि एकदम तिनें मान टाकली. तें सुकुमार फूल आईच्या मांडीवर कोमेजून पडलें. आईचे डोळे तिला शेवटचें स्नान घालित होते. मांडीवर मुलीचा देह घेऊन ती माता दगडाप्रमाणें अचल अशी तेथें बसली होती. तिच्या जीवनांत अंधार होता. आणि आतां बाहेरहि अंधार येऊं लागला. ताईच्या डोळ्यांतील अश्रु वाळले होते. ती तेथें पाषाणवत् बसली होती. पति घरीं आला, त्यानें बटण दाबून दिवा लावला. परंतु विजेचा प्रकाश जीवनांतील अंधार दूर करुं शकत नव्हता.

 

पुढे जाण्यासाठी .......