बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

घनाचा आजार !

किती तरी वर्षांनी सखाराम घरी आला होता. ते लहानसे तालुक्याचे गाव. परंतु रेल्वे होती म्हणून महत्त्व होते. आईला, वडील भावाला आनंद झाला. परंतु सखाराम घरात ताई दिसली नाही. ताई त्याची मागे आलेली बहिण. लहानपणीच तिचे लग्न लावण्यात आले होते. आणि एकदोन वर्षांतच पती वारला. सासरी हाल होत म्हणून ती घरीच येऊन राहिली होती. सखारामला ताईची आठवण येऊन रडू येई. त्याला ताईच्या शतस्मृती येत. गावातच सासर. एकदा दादा ताईला घेऊन सासरी गेला. विधवा बहिणीला घेऊन सासरी गेला. परंतु दादा परत निघताच तीही त्याच्या पाठोपाठ धावली. त्याने तिच्या थोबाडीत मारली.

“कोठे येतेस ओरडत? घराला का काळिमा फासायचा आहे? सासरीच रहा.” दादा दु:ख-संतापाने म्हणाला.

“मी जीव देईन दादा. या नरकात मला नको ठेवू-” ती दीनवाणी गाय म्हणाली.

“घेऊन जा तुमची बहीण. पांढ-या पायाची अवदसा! नव-याला खाल्लन्: आणखी कोणाला खायची. जीवबीव देऊन आमच्या मानेला गळफास लावायची. न्या तुमची बहीण.” सासू तणतणत म्हणाली.

शेजारीपाजारीही “घेऊन जा बहीण” म्हणाले. आणि दादा बहिणीला घेऊन घरी आला. पुन्हा ती सासरी गेली नाही. ती घरात दु:खी-कष्टी असे. मालतीने ताईची हकीकत सांगितली. क्षयी होऊन ती मेली. परंतु स्वत:च्या थुंकीची वाटी स्वत: नेऊन कफ पुरी. स्वत: वाटी धुवी. ती कुणाला स्वत:चे काम करु द्यायची नाही. सखाराम आईजवळ ताईचा पुनर्विवाह करावा म्हणायचा. परंतु आईला तो विचारही सहन होत नसे. सखाराम ताईच्या दु:खाने दु:खी असे. पुढे तो घरातूनच गेला! कित्येक वर्षांत त्याला घरचे काही कळले नव्हते आणि घरी आला तो ताई नाही! त्याला ताईचा आत्मा आपल्याभोवती आहे, असा भास होई. त्या घरात का तिचा आत्मा त्याच्यासाठी घुटमळत होता?

 

पुढे जाण्यासाठी .......