मंगळवार, जुलै 14, 2020
   
Text Size

घनाचा आजार !

“काका, आजी मघा रडत होती.”

“रडत नसेल, डोळे चोळीत असेल.” सखाराम म्हणाला.

“खरेच रडत होती. आजी कधी कधी रडते. तिला कोणी रागवत नाही, मारत नाही, मग का हो काका, आजी रडते?” जयंताने विचारले.

“मी विचारीन हो. जयंता, तुला मास्तर मारतात का रे?”

“एकदाच छडी बसली काका. आमचे मास्तर ठेंगणे आहेत, परंतु मारतात जोराने. मी रडलो.”

“का रे, त्यांनी तुला मारले?”

“मी मित्रांजवळ बोलत होतो म्हणून.”

“कोण तुझा मित्र?”

“तो बाळशा. काल नव्हता का आला? तो झाडावर झपझप चढतो. बोरीच्या झाडावरसुद्धा चढतो. त्याला काटे नाही बोचत. आणि मग ते झाड गदागदा हालवतो. आम्ही मुले बोरे वेचतो. बाळशालासुद्धा मास्तर मारतात. एकदा त्याच्या खिशात बोरे सापडली म्हणूनच मारले हो त्यांनी. सारी बोरे त्यांनी बाहेर फेकली. काका, बोरे का वाईट?”

“अरे, रामाला शबरीने बोरे दिली होती.”

“उष्टी ना? दातांनी खाल्लेली. चिमणीच्या दातांनी खाल्ली असतील. होय ना काका?”

इतक्यात पारवी आली गात गात-
“इवलं इवलंसं पाखरू
लाल लाल ग त्याची चोच
गुंजावाणी ग त्याचे डोळे
सातापाचांनी बाळ खेळे
की पाखरू माझे।।”

“आली पारवी.” जयंता म्हणाला.

ती काकांच्या मांडीवर जाऊन बसली. ती टाळ्या वाजवीत होती, गाणे गात होती.

“काका ते दह्याचे गाणे म्हणा.” ती म्हणाली.

“तुला दही आवडते?” सखारामने विचारले.

“हो आणि त्यात साखर!”

 

पुढे जाण्यासाठी .......