बुधवार, जुन 03, 2020
   
Text Size

भारत-चित्रकला-धाम

सुनंदानें पंढरीसाठी मेजवानी केली.
''शेवटची मेजवानी'' तो म्हणाला.
''परत सुखरुप ये'' सुनंदा म्हणाली.
सायंकाळीं ताईबरोबर पंढरी राममंदीर, धबधबा सारें बघायला गेला. मंदिरांतील चित्रें पाहून तो तन्मय झाला.

''रंगा जादुगार आहे'' तो म्हणाला
''तुमच्या मित्राची तुम्ही करालच स्तुति.''
''तुम्हीहि त्याची स्तुति कराल. बहिणीला भावाची स्तुति का आवडत नाहीं ?''
''भाऊ आजारी आहे. तुम्ही पत्र पाठवा.''
''आम्हांला पत्रें कशीं पाठवतां येणार ?''
''ते तुमची आठवण काढीत, नयनाची काढीत. ते फार थकले आहेत.''
''नयना कोठें आहे ?''
''युरोपांतून आली कीं नाहीं कळलें नाहीं''
''तिचें रंगावर प्रेम आहे.''
''तुमचें कोणावर आहे''
''मरणावर''
''शिपायी वाटेल तेथें प्रेम करतो''
''इतका प्रेमवेडा मी नाहीं''
ती दोघें बोलत येत होती.
''तुम्हांला जगांत कोणी नाहीं,  मला कोणी नाहीं.
आपण समदु:खी आहोत. मलाहि मरावें वाटतें.''
''रंगा आहे. तो तुम्हांला कांही कमी पडूं देणार नाहीं.''
''माझें आयुष्य प्रभु त्यांना देवो.''

पंढरी, ताई घरीं आली. रात्रीच्या गाडीनें पंढरी जाणार होता, मित्र कडकडून भेटले.
''रंगा, जिवंत रहा. काळजी घे.''
''तूं सुखरुप परत ये. राजीनामा कां देत नाहींस ?''
''ते गोळी घालतील, तुरुंगांत टाकतील. आणि जगण्यांत तरी काय राम आहे ?''

पंढरी निघाला. तो सुनंदाआईच्या पायां पडला. त्याचे डोळे भरुन आले. सर्वांचेच भरुन आले.

 

पुढे जाण्यासाठी .......