रविवार, जुन 07, 2020
   
Text Size

भारत-चित्रकला-धाम

ताईच्या हातांत तें पत्र होतें. शेवटीं तिनें त्या पत्राचे तुकडे तुकडे केले. त्या पत्रांत एक फोटो होता. तो तिनें फाडला. तुकडे करुन ती रडत बसली. मागून ते जुळवूं बघत होती !

रंगाचीं चित्रें संपत आलीं होती. रंगपंचमीच्या दिवशीं रात्रीं तें शेवटचें चित्र तो रंगवित होता. रात्रभर कर्ममग्न होता. कुंचल्याचा शेवटचा स्पर्श करुन तो उठला. प्रभूच्या समोर दंडवत् त्यानें लोटांगण घातलें. एक जीवनकार्य पार पडलें होतें. तो हेलावला होता. त्यानें ती सारी चित्रसृष्टि पाहिली. वसिष्ठ-विश्वामित्रांपासून तो महात्माजींपर्यंतचा भारती इतिहास तेथें होता. ठळक ठळक दिव्य प्रसंग.

परंतु इतक्यांत दृष्ट वार्ता कानीं आली कीं शेटजींची हृदयक्रिया बंद होऊन ते अकस्मात् देवाघरीं गेले. रात्रीं निजले ते निजले. सकाळीं नोकर उठवायला गेला तों सारा खेळ खलास. डॉक्टरांनीं हृदय थांबलें म्हणून निर्वाळा दिला. रंगा लगबगीनें गेला. त्यानें त्या साधकाला प्रणाम केला. रंगाचें शेवटचें चित्र तिकडे संपलें नि इकडे जीवनखेळ संपला ! विचित्र योगायोग.

मुंबईहून शेटजींची कौटुंबिक मंडळी आली. सारे विधि झाले. शेटजीनीं मृत्युपत्र केलें होतें कीं नाहीं कोणास ठाऊक ? त्यांच्या मुलानें मंदिराची कांही व्यवस्था केली. रंगा त्यांना भेटला. त्यांनींच बोलावलें होतें.

''तुमचें कांही देणें आहे का ? तुम्ही काढलींत तीं चित्रें ?''
''मीच काढलीं.''
''तुम्ही मुंबईस याल चित्रें काढायला ?''
''नाहीं. मी धंदेवाईक नाहीं.''
''पोटाला नको का ? धंदा काय वाईट असतो ? आमचा तर दिवसरात्र धंदा असतो.''

''म्हणून तर लक्षाधीश होतां.''
''तुम्ही व्हाल लक्षाधीश. मुंबईस चला. आम्ही सांगूं तशी काढा चित्रें.''
''नको.''
''ठीक. तुमचें कांही देणें ?''
''सारें चुकतें झालेलें आहे.''
''तुमच्याकडे अधिक दिले आहेत कीं काय ? शिल्लक नाहीं ना रक्कम ?''
''तें मृताला विचारा.''
''मेलेला का बोलणार ? तुम्ही सांगाना खरी वार्ता''
''मी येतों. बसा आपण.''

 

पुढे जाण्यासाठी .......