शनिवार, जुन 06, 2020
   
Text Size

भारत-चित्रकला-धाम

रंगा निघून गेला. त्या धनंपूजकांचा वारा त्याला सहन होईना. शेटजी शेवटीं प्रेमाची देणगी देणार होते. परंतु रंगाच्या तोंडून शब्दहि बाहेर पडला नाहीं. तो रामभक्त गेला. या माकडांना कशाची किंमत ?

अपरंपार श्रमानें रंगा आजारी पडला. सुनंदा त्याच्याजवळ बसे. कांही दिवसांनी त्याला बरें वाटलें. त्यानें घरावर '' भारत चित्रकलाधाम '' म्हणून स्वत:च्या हातानें रंगवून लिहून पाटी लावली. एका खोलीत भिंतीवर त्यानें स्वत:चीं व इतर कांही चित्रें लावलीं. कांही बोधवाक्यें होतीं.

अमेरिकेंत चित्रकलेचें एक जागतिक प्रदर्शन भरणार म्हणून त्यानें वाचलें. आपणहि त्याच्यासाठीं चित्रें तयार करावीं असे त्याच्या मनानें घेतलें. भारत-दर्शन म्हणून त्यानें एक योजना तयार केली. भारतांतील रम्य ग्रामीण जीवन; भारतांतील निसर्ग; भारतांतील ध्येयें; भारतांतील दारिद्र्य; नवभारताचीं समाजवादी स्वप्नें; अनेक कल्पना त्यानें मनासमोर मांडल्या. नवभारताच्या निर्मात्यांची कांही चित्रें. ती महान् योजना होती. तो त्या योजनेवर खपूं लागला.

परंतु ते श्रम त्याला झेपत ना. त्यानें पुन्हां आंथरुण धरलें.
''रंगा, किती रे श्रमायचें. हळूहळू नाहीं का करतां येणार ?''
''आई, जगांत हळूहळू करुन कसें चालेल ? मृत्यु तर झपाट्यानें येत असतो. त्याच्या आंत आपलें कार्य पुरें व्हायला हवें.''

''आपणच मृत्यूला ओढून आणतों.''
अलीकडे ताई रंगाजवळ बोलत नसे. ती दूर असे, दूर बसे. ती गंभीर झाली होती रंगाला त्यामुळें बरें वाटे. परंतु तिनें बोलावें, आनंदी असावें, असें त्याच्या मनांत येई. मनांत प्रसन्नता फुलण्यापूर्वीची ती वेदना असेल असा तो तर्क करी; पहांटेपूर्वीचा तो अंधार असेल असें मनांत म्हणे.

जगांतील महायुध्द पेटलें. ठिणगी पडली. भराभरा घटना घडूं लागल्या. रशिया जर्मनीचा करार झाला. इंग्लंड, फ्रान्स, पोलंड-सर्वत्र मारणमरण सुरु झालें. अमेरिका तटस्थ होती. हिंदुस्थानचें काय ? तो युध्दाच्या आगींत ओढला गेला.

नयना कोठें होती ? ती परत आली असेल का ?
''काय रे रंगा, तिचें पत्र नाहीं आलें ना तुला ? तूंच म्हणाला होतास कीं ती युरोपांत गेली आहे म्हणून.''

''तिचें पत्र नाहीं. रंगावर रुसली रागावली असेल. परंतु तिचे बाबा थांबणार नाहींत. ते तिला घेऊन निघाले असतील.''

 

पुढे जाण्यासाठी .......