रविवार, आँगस्ट 09, 2020
   
Text Size

भारत-चित्रकला-धाम

रंगाला फारच थकवा आला. तो वेळ जात नसे म्हणून थोंडें काम करी. परंतु लगेच थके. पुन्हां पडून राही.

एके दिवशी अकस्मात् पंढरी आला. रुबाबदार लष्करी पोषाखांत तो होता.
''काय रे, मरत पडलास वाटतें.''
''तूंहि मरायला चाललास ना ?''
''मरायला नि मारायला. जागांत दुसरें आहे काय ?''
''पंढरी, तुला कोठें पाठवणार आहेत ?''

''अरें तें का आम्हांला सांगतात ? कोणी म्हणतात इराणांत, कोणी म्हणतात अफ्रिकेंत. हरि जाणे. तुला शेवटची मिठी मारायला आलों आहें. रंगा. हें तूं दिलेलें भारतमातेचें चित्र. हें खिशांत असतांना मरण येऊं दे. कोठेहि मेलों तरी भारतमाता जवळ आहे. या कोण ?''

''ही ताई. तुला पुरणपोळी केली होती. यांच्याकडचाच पाटावरवंटा आणला होता.''
''त्यांची ती छोटी लिली. मोठी गोड मुलगी.''

''ती मुलगी गेली. ताईचे यजमान गेले. ती येथें असते. भावाजवळ बहीण आहे. दुर्दैवी बहीण.''

''रंगा, जगांत कोण सुदैवी आहे ? अरे तुला मी गालिचा आणला आहे. त्या अफगाणानें दिलेला. तो तुझ्याकडे ठेव. तुला सर्व जगाचें प्रेम हवें असतें. होय ना. मी सार्‍या वस्तु तुझ्याकडे घेऊन आलों आहे. सुंदर सुंदर कलात्मक वस्तु. मला तूंच एक आहेस. तुझें घर तेंच माझें. जिवंत कधीं आलों परत तर भेटूं.''

''माझाहि काय नेम पंढरी ?''
''जागांत कशाचाच नेम नाहीं.''
पंढरी रंगाचा हात हातांत घेऊन बसला.
''उतर तुझें खोगीर.''
पंढरी उठला. त्यानें लष्करी पोषाख उतरला. धोतर शर्टमध्यें तो किती सुरेख दिसत होता.

''पंढरी तुझी प्रकृति सुधारली. जरा गोरा झालास.''
''थंड हवा. फळांचा आहार. निश्चिन्त जीवन.''

 

पुढे जाण्यासाठी .......