बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

रंगाचें निधन

''आई, मी थोडे दिवस घरीं जाऊन येतें. बाबांना सारें सांगून येते. आमच्या लग्नाला त्यांचा आशीर्वाद घेऊन येतें. ते प्रसन्न झाले तर प्रभूची कृपा. मग मी रंगाला घेऊन कोठेंतरी दूर जाईन. हवेच्या ठिकाणी तो बरा होईल. तो इतक्यांत तुम्हां आम्हांला नाहीं सोडून जाणार. त्याच्या कलेचा सुगंध सर्वत्र दरवळेपर्यंत तो कसा जाईल ? येऊ ना घरीं जाऊन ?''

''ये बाळ. तुझें प्रेम पाहून मला धन्यता वाटली. सावित्रीची आठवण झाली. सत्यवान् मरणार असें जाणूनहि तिनें त्यालाच माळ घातली. तुझी प्रीति, तुझी निष्ठा त्याच तोलाची. ये जाऊन. तुझे वडील तुला दूर लोटणार नाहींत. थोडा वेळ रागावतील, रुसतील. परंतु पुन्हां तुला जवळ घेतील. ये जाऊन.''

नयना आज सायंकाळच्या गाडीनें जाणार होती. हल्लीं घरांत तीच स्वयंपाक करी. कधी संध्याकाळी ताई करी. ताई आतां विरक्ताप्रमाणें वागे.

''नयना, लौकर ये परत. रंगाची मला काळजी वाटते. भाऊ वरुन आनंदी दिसला, हंसला खेळला, तरी त्याचें जीवन पोखरलें गेलें आहे.''

''मी त्याला कोठेंतरी नेईन''
''परंतु वडील नाहीं प्रसन्न झाले तर ?''

''तर मी कोठेंतरी नोकरी करीन आणि तुम्ही भाऊला घेऊन कोठें तरी सुंदर हवेच्या ठिकाणी रहा. रंगाच्या बोटांतील दिव्य कला जरी या माझ्या बोटांत नसली तरी मीहि सुंदर चित्रें काढूं शकते. मुंबईस मुलींचा चित्रकलावर्ग चालवीन. रंगाला मी मरुं देणार नाहीं. तुम्ही भाऊची घ्याल काळजी ? मी लागतील तितके पैसे पाठवीन.''

''मी शिकलेली असतें तर मीच पाठवले असते. तुम्ही रंगाबरोबर गेलां असतां. घरीं जाऊन तर या.''

''ताई, मला तुम्ही असें नका म्हणूं.''

''अजून एखादेवेळेस तें तोंडात येतें. नयना, रंगावर किती तुझें प्रेम ! मला वाटे की रंगावर माझें प्रेम आहे. ती भूल होती. तो माझा भाऊच आहे. तुमचें पत्र मी फाडले, फोटो फाडलें ! माणूस किती द्वेषीमत्सरी असतो. तुम्ही माझ्याजवळ प्रेमानें वागतां. मनांत अढी ठेवलीत नाहीं. रंगा, तुम्ही, सुनंदाआई, सारीं थोर माणसें.''

 

पुढे जाण्यासाठी .......