गुरुवार, जुलै 09, 2020
   
Text Size

स्वातंत्र्याच्या युध्दांत

''नयन एटले आंख. तमें तो आंख छो. प्रभूनो आंख. सुंदर नाम. आवजो हां बेन. पूर्वजन्मनी पहछान हशे एम लागे छे.''

नयनाला मणीच्या आईनें स्वत:चा पत्ता दिला. मणीला तर तिचें वेड लागलें.
''तुमच्या बॅगेंत काय आहे बघूं ? आणखी चित्रें आहेत ?''
''बघ आहेत का.''
मणीनें बॅग उघडली. सारें पाहिलें. तिनें नयनाला फळें सोलून दिली. नयनाचे डोळे एकदम भरुन आले.

''आंखमां पाणी शा माटे ?''
''आंख दुखे छे''
मणीनें नयनाचे डोळे पाहिले. पुंच्कर घालूं, कण गेला असेल, असें तिनें विचारलें. नयनानें तिला जवळ घेतलें. आणि ती मुलगी तिला बिलगून बसलीं. तिच्या मांडीवर डोकें ठेवून पडली.

''मणी, सुवानी टाईम नथी बेटी. ऊठ.''
''मने सुवादे जरा.''
ती निजली. आणि नयना तिच्या केसांवरुन हात फिरवित होती. मणीची आई बोलत होती; विचारित होती. नयना थोडें थोडें सांगत होती.

घाट संपला. इगतपुरी, कासारा जाऊन कल्याण आलें. मणी उठली. तिनें हंसून नयनाकडे पाहिलें.

''स्टेशनपर हमारी मोटर आवशे. अमारे त्यांज चालोना नयना''
''ना, एम केम चाले. हूं तमारे त्यां आवीश, पीछे आवीश.''
''भूलना नहीं.''
''केम भूलूं ? मणीनी लागणी छेज ना''
नयना दादरलाच उतरली. तिनें मणीच्या हातांचे चुंबन घेतलें. मणी तिच्याकडे पहात होती. गाडी गेल्यावर नयना बापूसाहेबांकडे गेली. ते घरीं वाटच पहात होते. सायंकाळ झाली होती. नयना थकली होती. मणींमुळें तोंडावर जरी थोडी टवटवी आली असली तरी ती वरवरची होती. जीवनाचे आंतील झरें जणूं सुकून गेले होते. ती तेथें भिंतीशी बसली. तिचे डोळे भरुन आले. तिला हुंदका आला. ती स्वयंपाकघरांत गेली. बापूसाहेबांच्या प्रेमळ पत्नीनें धीर दिला.

''नको रडूं नयना.''
''रडूं नको तर काय करुं ? आम्ही एकमेकांच्या जवळ आलों काय नि क्षणांत कायमची ताटातूट होते काय ? विश्वशक्तीचे आई काय हे खेळ ?''

 

पुढे जाण्यासाठी .......