शनिवार, आँगस्ट 15, 2020
   
Text Size

गुणा कोठें गेला गुणा?

“परंतु आपल्याकडेच येणार वाडा.”

“अहो त्या वाड्यांत असते धन तर रामराव कशाला जाते? त्यांनी नसते का खणून पाहिले? उगीच फसाल झाले.”

“पण हे गेले कुठे?”

“जीवबीव तर नाही ना देणार?”

“अहो तिघे का जीव देतील?”

“अहो त्या मद्रासकडे का कोठे एका कुटुंबातील सात जणे मेली. मुलांनाहि त्यांनी जगांत ठेवलं नाही. काय वाईट स्थिति!”

जगन्नाथ एकदम खाली आला. तो भावनांनी कापत होता.

“खरेच का गुणा गेला? त्याचे आईबाप गेले?”

“त्यांच्या घराला कुलूप आहे खरे. मग कोठे गेले असतील देव जाणे.”

“फिरायला नसतील तिघे गेली?”

“आजपर्यंत कधी फिरायला गेली नाहीत.”

“पद्मालयाला तर नसतील गेली?”

“अहो आम्हांला तरी काय माहीत?”

“दादा, माझ्या मित्राला तू दवडलेस. तू फसवलेस मला. आईच्या पायाची शपथ घेतली होतील.”

“मी कोठे घेतली होती शपथ?”

“आणि देवासमक्ष खरे सांगेन असे कोर्टकचेरीत नेहमी म्हणावेच लागते. ती रूढी आहे. विद्येशपथ, आईशपथ, असे म्हणतात.”

“म्हणजे ते म्हणणे का खोटे?”

“तुला व्यवहार कळायला सात जन्म लागतील.”

“आग लाव त्या व्यवहाराला.”

 

“आणखी कोण दूर आहे?”

“आणखी कोण?”

“अरे, शिरपूरला हो.”

“अजून ती आठवण येत नाही. ओळखच नाही.”

“होईल ओळख. मग गुणाची आठवण कमी होईल. आमची तर झालीच आहे कमी. जाणा-यांची, लौकर मरणा-यांची कशाला आठवण? नवीन कळ्या गोड दिसतात, ताजी फुले छान दिसतात.”

“आई, गुणा ताज्या फुलाप्रमाणेच घवघवीत दिसायचा?” असे म्हणून तो चरण गुणगुणूं लागला.

“ताज्या फुलापरि दिसे मुखडा गुणाचा
माझा गुणा मधुमना पुतळा गुणांचा”

ते चरण गुणगुणत तो जाऊ लागला.

“अरे, दूध पी व मग जा.”

“गुणा येणार आहे. तो व मी बरोबर पिऊ आणि मग जाऊ.”

बराच वेळ झाला. गुणा आला नाही. तो खाली काही तरी बोलणे चाललेले त्याच्या कानी आले. तो ऐकू लागला.

“अहो घराला कुलूप आहे.”

“गाव सोडून गेले की काय?”

“अब्रू जायची पाळी आली. कशाला राहतील?”

“वाड्याचा लिलाव होणारच होता. तो काही टळत नव्हता.”

 

रात्री जगन्नाथला नीट झोप आली नाही. कितीदा तरी त्याच्या मनात आले की गुणाकडे जावे. त्याच्याजवळ बसून आज पोटभर गावे. परंतु आता कोठे जायचे रात्री? तो खिडकीजवळ उभा राही. त्या एका रात्री चंद्र त्या खिडकीतून डोकावत होता. आज अंधार होता. आकाशातील तारे थरथरत होते. माझा गुणा का रडत आहे? हे का त्याचे अश्रु? त्याने खिडकीतून हात पुढे केले. जणु गुणाचे अश्रु पुसण्यासाठी. परंतु ते अश्रु दूर होते. अनंत आकाशात होते. त्याला हसू आले. आणि खरोखरच गुणाचे अश्रु आता दूर होते, दूर जात होते. ते पुसायला त्याचे हात पोचते ना.

पहाटे पहाटे त्याला झोप लागली. किती तरी उशिराने तो उठला. अजून उठला का नाही म्हणून आई पहायलाहि आली. परंतु शांत झोपला आहे असे पाहून त्याच्या अंगावरचे पांघरूण सरसावून व खिडकी बंद करून प्रमळ माता गेली.

जगन्नाथ उठला. त्याने खिडकी उघडली. प्रकाशाचा झोत आला. जणुं मित्रप्रेमाचा प्रकाश आला. गुणा येऊन गेला असेल असे त्याला वाटले. ही खिडकी उघडी होती. गुणा बंद करून गेला वाटते! मला न उठवता गेला! हळूच आला हळूच गेला. कोमळ, प्रेमळ गुणा.

तो खाली गेला. त्याने प्रातर्विधि केले.

“आई, गुणा का आला होता?”

“कधी? नाही रे?”

“मग वर खिडकी कोणी लाविली? मी निजतांना तर उघडी होती. कोणी लावली? मला वाटले गुणा येऊन गेला.”

“मी आल्ये होत्ये हो. तुला आपला जेथे तेथे गुणा दिसतो. आमचेहि थोडे प्रेम आहे हो तुझ्यावर. आई येऊन गेली असेल, पांघरुण घालून गेली असेल, असे रे का नाही तुझ्या मनात आले? आमची का नाही तुला आठवण येत?”

“तुम्ही घरांतच आहात. गुणा जरा दूर तिकडे राहातो. माणूस दूर असते तयाची आठवण येते.”

   

पुढे जाण्यासाठी .......