शनिवार, जानेवारी 16, 2021
   
Text Size

इंदिरा

दोघं म्हातारी नवराबायको रहात होती. जगन्नाथचे प्रथम प्रथम वरचेवर पत्र येई. परंतु पुढे वेळेवर पत्र येईनासे झाले. तिकडे इंदिरेला जगन्नाथने कळविले. तिला वाईट वाटले. कां बरे वाईट वाटले? म्हाता-या सासूसास-यांजवळ कोणी नाही या गोष्टींचे तिला वाईट वाटले.

परंतु इंदिरेला फार दिवस तेथे रहावे लागणार नव्हते. कारण महिलाश्रम बंद करावा असे ठरू लागले. जेवढा फायदा मिळाला तेवढा इंदिरेने घेतला. थोरामोठ्यांचे शब्द तिने ऐकले. मोठमोठ्या देशभक्तांची तिला दर्शने घडली. अनेक गोष्टी कळल्या, पुष्कळ माहिती तिला झाली.

एके दिवशी इंदिरा एरंडोलला परत आली. आज ती एकटीच परत आली. गेली होती तेव्हा जगन्नाथ बरोबर होता. आज जगन्नाथ फक्त मनांत होता. ती सासूसास-यांच्या पाया पडली. घरांत वावरू लागली. आता सारे काम तिने आपल्या हाती घेतले. सासूसास-यांची ती मनापासून सेवा करूं लागली.

परंतु जगन्नाथचे बरेच दिवसांत पत्र आले नाही. पंढरीशेट दु:खी-कष्टी दिसत. जगन्नाथची आई रडे. दोघांचे जगन्नाथवर फार प्रेम होते. जगन्नाथची आई आता इंदिरेलाच वाटेल ते बोले. ती आपल्या दु:खाला, मनांतील उद्वेगाला वाट देई. परंतु इंदिरेला ते वाग्बाण लागत. ती बोलत नसे, सारे सहन करी.

“तू आश्रमांत राहतीस ना, जातीस ना, तर तो न जाता. तू कशाला तेथे राहिलीस? तेथे काय होते? आमचा मुलगा तू दवडलास. आण शोधून त्याला. इतके दिवस आम्ही त्याला जाऊ दिला नाही. डोळ्यांतील पाण्याने थांबवला. परंतु तू त्याला जायला सांगितले असशील. म्हाता-या आईबापांपासून जा, कशाला राहता, असे सांगितले असशील. स्वत: गेलीस, त्यालाहि दवडलेस.”

“परंतु मी त्यांना घरी रहा असे सांगितले होते. मी येईपर्यंत तरी जाऊ नका असे सांगितले होते. तुम्हीय त्यांना जायला सांगितलेत. त्यांनी पत्रांत तसे मला लिहिले होते. आई आतांच जा म्हणते, तू तिकडे आहेस तो जाऊन ये म्हणते म्हणून मी जातो. असे त्यांनी मला कळविले. माझा काय बरे दोष?”

“मग त्याला का इथे दु:खी-कष्टी एकटा राहूं देऊ? म्हटले तूहि जा. तुझी राणी येईपर्यंत तू जा; परंतु तू तेथे राहिलीस का? घरी यायचे ते सोडून तेथे कां राहिलास? तुझा पायगुण काही बरा नाही. वाटले होते की तू त्याला बांधून ठेवशील. म्हणून तुला माहेराहून आणले. परंतु उठलीस व वर्ध्याला जाऊन राहिलीस, हल्लीच्या तुम्ही मुली! काय काय कराल ते थोडेच आहे! नवरे सोडून का कोणी आश्रमांत जाऊन राहते? जोगीण का बनायचे आहे?”

 

पुढे जाण्यासाठी .......