मंगळवार, जुन 02, 2020
   
Text Size

एरंडोलला घरीं

“तुम्ही आम्हांला कांही सांगा.” इंदु म्हणाली.

“काय सांगू ? गरिबांची स्थिति सुधारा. श्रमणा-यांची स्थिति सुधारा. आपलें फार पाप झाले. ज्या समाजांतील गरीब, श्रमणारी जनता सुखी नाहीं, तो समाज केवळ पापमय आहे. जन्मभर तेंच सांगत आलों. आतां मरतांना तेंच सांगत आहे. हजारों लोकांची तोंडे तुम्हांला न बोलतां सांगत नाहींत. का ? येथें शेतकरी येतात. त्यांच्या अंगावर चिंध्या असतात. किती दु:खी कष्टी असतात. ते किती गरिबानें बोलत बसतात ! वास्तविक सा-या जगाला पोसणारे ते. त्यांच्यामुळें सारे जग जगतें, परंतु त्यांची किती कष्टप्रद दशा ! त्यांच्या चिंध्या पाहून कांही येतो का तुमच्या मनांत विचार ? त्यांचे दैन्य पाहून, दीनवाणेपणा पाहून येतें ता चित्त गहिवरून ? येते का चीड, येतो का संताप, वाटतें का अपरंपार दु:ख ? काय मी सांगूं ? मुलें येतात, म्हणतात कांहीं सांगा. मोठे येतात म्हणतात कांहीं सांगा. पुराण का सांगायचें आहे ? मला एकच सांगायचे आहे की क्रांति करा. समाजरचना बदला. शेतक-याला वाचण्यासाठी मरा. त्याला पोटभर खायला उरेल, त्याच्या जीवनांत आनंद राहील असें करा. काय सांगूं आणखी ?”

दयाराम थांबले. इंदु, गुणा, इतर विद्यार्थी सारे शांत होते. सर्वांच्या तोंडावर गंभीर विचाराची छाया होती. दयाराम पुन्हां बोलू लागले.

“गुणा, तूं क्षयरोगासाठी दवाखाना काढणार आहेस. चांगली आहे गोष्ट. परंतु अरे क्षयरोग कां होतो? क्षयरोग खेड्यापाड्यांतूनहि पसरला आहे. गरिबांना खायला नाही म्हणून क्षयरोग होत आहे व श्रीमंतांना अधिक खायला आहे म्हणून क्षयरोग होत आहे. सर्वांना पुरेसें खायला करा म्हणजे क्षयरोग जातील. गरिबांना जरूरीपेक्षां अधिक श्रम आहेत म्हणून क्षयरोग आहे. श्रीमंतांना श्रमच नाहीत म्हणून क्षयरोग आहे. सर्वांना बेताचा श्रम द्या म्हणजे क्षयरोग जातील. एक हॉस्पीटल काढून काय करणार ? कांहीच नाही त्यापेक्षां बरें आहे. परंतु येथील सारी राज्यपद्धति बदलली पाहीजे. समाजरचना बदलली पाहिजे. “राजा कालस्य कारणम्”---राज्यपद्धतीवर परिस्थिति अवलंबून असते. समाजस्थिति सुधारायला पाहिजे असेल तर राज्यपद्धति सुधारा. गरिबांचा कैवार घेणा-यांचे राज्य हवें. त्यासाठी त्यांची संघटना केली पाहिजे. तुम्ही बुद्धिमान तरूणांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारलें पाहिजे. त्यांच्यांत राजकीय जागृति केली पाहिजे. कोणी करायचें हे काम ? धर्माधर्मांची भांडणें आहेत. जातीजातींची भांडणे आहेत. या सर्व क्षुद्र वृत्तींच्या संकुचित लोकांपासून जनतेला वांचविणे हें तुमचें काम आहे. क्रांतीचे काम हें पहिले काम. ते नसेल झेपत तर मग हें दुय्यम काम करा. तात्पुरते इलाज ---- काढा एखादा दवाखाना, घ्या खादीचा धंदा. घ्या एरंडोली कागद. परंतु ही तात्पुरती मलमपट्टी आहे. खरा प्रश्न खोल आहे. ज्या वेळेस ग्रामोद्योग आणा. श्रमणा-यांची पिळवणूक दूर झाली पाहीजे, ही दृष्टि हवी. श्रमणा-यांना भरपूर मिळेल अशी खबरदारी घेणारें सरकार पाहिजे. मी काय सांगूं ? तुम्ही तरुण आहांत. करा संघटना, करा विचार व आजूबाजूचें जग अधिक सुखी करण्यासाठीं झटा. दु:ख, अन्याय, विषमता, पिळवणूक कमी करा. हो गुणा, जगन्नाथ, तुम्हीं घ्या हातीं क्रांतीचा झेंडा. इंदु, इंदिरा जाऊं दे शेतक-यांच्या बायकांत. सर्वांना ज्ञान द्या, साक्षर करा, त्यांच्या जीवनात शिरा.”

दयारामांना दम लागला. जणुं ते शेवटचे बोलत होते. ते गप्प बसले. एकदा सर्वांकडे त्यांनी पाहिलें. नंतर डोळे मिटून पडून पाहिले. एक दोन दिवस गेले आणि दयारामांनी देह सोडला. क्रांति, क्रांति करीत ते गेले. क्रांति म्हणजे त्यांचें रामनाम. क्रांति म्हणजे धर्म. क्रांति म्हणजे संस्कृतीचा, अखिल मानवी संस्कृतीचा मंगल आरंभ. त्या क्रांतीचें स्मरण करीत ते गेले. त्या क्रांतीसाठी पुन्हां जन्म असला तर ते येतील. पुन: पुन्हां येतील, हाडें झिजवतील, क्रांतीसाठी प्राण देतील.

त्यांच्या स्मशानयात्रेस हजारों लोक जमले. खेड्यापाड्यांतून शेतकरी धांवत आले. त्यांनी फुले उधळली. गुणानें दोन शब्द सांगितले.

“बंधूनो, दयारामाचें स्मरण म्हणजे गरिबांचे स्मरण. दुसरें मी काय सांगूं ? त्याचे जीवन गरिबांच्या प्रश्नांशी एकरूप झालेलें होतें. दरिद्री नारायणाशी ते समरस झाले होते. तुरूंगात त्यांची प्रकृति ढासळली. ते निघून गेले. परंतु त्यांची स्फूर्ति आपणांत राहील. त्यांचा आत्मा आपल्या भोवती घिरट्या घालीत राहील. आपण कांही करतो कीं नाही, गरिबांची बाजू घेऊन उठतों की नाही हें त्यांचा आत्मा पहात राहील.”

दयाराम भारतीचें एकाएकी मरण ! गुणाच्या मनाला तो एक मोठाच धक्का बसला. त्यांचे शब्द त्याला आठवत. आपण काय करावें तें त्याला कळेना.

 

पुढे जाण्यासाठी .......