रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

येथें नको, दूर जाऊं

शेवटी रामरावांवर फिर्याद झाली. कोर्टात सुरू झाले काम. या फिर्यादीचा शेवट कशांत होणार ते त्यांना माहीत होते. हुकूमनामा होईल. घरावर जप्ती येईल. पुढे लिलाव होईल. अब्रू जाईल. रामरावांना चैन पडेना. त्यांच्या पत्नीसहि फार वाईट वाटले.

“आई, वाईट नको वाटून घेऊ. जगन्नाथ लिलाव होऊ देणार नाही. त्याने तसे वचन दिले आहे.”

“बाळ, त्याच्या शब्दाला कोण देईल किंमत? ते काही नाही हो डोळ्यांनी आतां सारे पाहवे लागेल. कानीनी सारे ऐकावें लागेल. नशीब आपले. आपले कर्म खोटे. दुस-यास काय बोल? आपण देणेकरी झालो. आंधरूण पाहून पाय पसरले नाहीत. मोठ्या नावावरगेलो. त्याचा परिणाम. असो. देवाची इच्छा. तुला काही नाही म्हणून वाईट वाचते. निदान घर राहते तरी पुष्कळ होते. आमचे काय आता! आमचे सारे झाले. मरायचे फक्त राहिले आहे.”

“आई, असे नको बोलू. मला मग रडू येते. मला इतर काही नको. परंतु तुम्ही तरी असा. तुझा प्रेमळ हात पाठीवर फिरवायला असू दे. बाबांचा आशीर्वाद रोज मिळू दे. तुम्ही दोघे आहांत तोपर्यंत मला सारे आहे. तुमचे कृपाछत्र म्हणजे माझी संपत्ति.”

“गुणा, असे तू बोललास बाळ म्हणजे भडभडून येते हो. किती रे तू चांगला गुणांचा.”

असे म्हणून ती माउली रडू लागली. तिने मुलाला जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून, पाठीवरीन हात फिरविला.

त्या दिवशी जगन्नाथ व गुणा अंजनीवर फिरायला गेले. एका दगडावर दोघे बसले होते. पायाशी पाणी नाचत होते. समोर बगळ्याने एकदम मासा धरला.

“कशी पट्कन् झडप घालतो नाहीं?” गुणा म्हणाला.

“दिसतो ढवळा मनांत काळा.” जगन्नाथ म्हणाला.

“आकाशांत काळे काळे पावसाळी ढग आले असावे, जरा सायंकाळ होत आली असावी. आणि मग हे बगळे उडतात. त्या आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर यांचे उडणे, पांढरे शुभ्र पंख पसरून जाणे फार सुंदर दिसते. मी कितीदा तरी पाहिला आहे तो देखावा. जणु काळ्या फळ्यावर पांढरी रेघ काढीत आहोत तसे ते त्यांचें उडणे वाटतें.”

 

पुढे जाण्यासाठी .......