मंगळवार, जानेवारी 26, 2021
   
Text Size

राजवाडयांची विशिष्ट मनोवृत्ति

तीन तपें निरलसपणें राजवाडे यांनी निरनिराळयाप्रकारें राष्ट्राची सेवा केली. प्रदीप्त प्रतिभा, अवर्णणीय नि:स्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता, अतुल कष्टशीलता इत्यादि सद्गुणांच्या साहाय्यानें आपल्या राष्ट्राची सेवा केली. कोणत्या हेतूनें राजवाडे या सेवेस प्रवृत्त झाले ? राष्ट्राचा अध:पात झालेला आहे. हा कां झाला, असे अध:पात कां होतात, कसे होतात - याची कारणमीमांसा करण्याच्या उद्देशानें ते आपल्या जीवित कार्यास लागले. आपल्या महाराष्ट्रास निकृष्ट स्थिति हीनदीन स्थिति कां आली हें नीट सम्यग् रीतीनें, समजून घेतल्याशिवाय, राष्ट्राच्या उध्दारार्थ योग्य दिशेनें प्रयत्न करणें शक्य होणार नाही हें त्यांच्या बुध्दीनें जाणलें. आपलें चुकतें आहे कोठें हें समजल्याशिवाय, आपणांस चुका सुधारतां येणार नाही. यासाठी ते आपला इतिहास यथार्थ स्वरूपानें पाहूं लागले. परकीय इतिहासकार आपल्या देशाचा इतिहास जिव्हाळयानें कसा लिहिणार ? इंग्लिश लोक नेपोलियन यास अधम म्हणतात, तर फ्रेंच लोक वेलिंग्टन यास तुच्छ लेखतात. तेव्हां हे परके लोक आपल्या भारताचा इतिहास असाच विकृत स्वरूपांत लिहिणार यांत शंका नाहीं. म्हणून प्रथम हा राष्ट्रीय स्मृति तयार करण्यासाठी राजवाडे तयार झाले. परंतु राजवाडे यांची दृष्टि एकांगी नव्हती. अनेक तऱ्हांनी व अनेक दिशांनीं आपणांस खटाटोप करावे लागणार हें त्यांस स्पष्ट दिसून येत होतें. परकी लोकांशी टक्कर द्यावयाची म्हणजे आपण त्यांच्या तोलाचे झाल्याशिवाय कांहीएक हातून होणार नाहीं असें ते म्हणत. प्रत्येक शास्त्रांत पाश्चात्य लोक पुढें पुढें जात आहेत व आपणांत शास्त्राभ्यास व शास्त्रसंवर्धन करणारा कोणीच पुढें येत नाही याचें त्यांस आश्चर्य वाटे. समाजशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहासशास्त्र, रसायनशास्त्र अशा प्रकारच्या सर्व शास्त्रांच्या अध्ययनांत गति करून घेतल्याविना आपला तरणोपाय नाही असें ते म्हणत. ही कामें एकेकटयानें होणार नाहीत. म्हणून त्यांनी संघटना करण्याचेही प्रयत्न केले. त्यांनी अनेक मंडळें स्थापन केली. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नमुन्यावर धुळें, अंमळनेर वगैरे ठिकाणी त्यांनी संस्था स्थापल्या. पुण्यास आरोग्यमंडळ ही सभा त्यांनी स्थापन केली. लोकांचे आरोग्य वाढल्याविना ते सशक्त व कार्यकर होणार कसे ? सावकारांच्या तावडीतून कुळास सोडविणारे-हलक्या दरानें कर्ज देणारें मंडळ त्यांनी काढलें होतें. रेल्वेसंबंधी उतारुंच्या तक्रारी दूर करणारें मंडळ त्यांनी काढलें होतें समाजशास्त्र मंडळ हें समाजाच्या सर्व अंगांचा विकासैक दृष्टीने अभ्यास करण्यासाठी त्यांनी काढलें होते. शिक्षाविचारमंडळ हें शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या चर्चा करण्यासाठी त्यांनी काढलें होतें. भौतिकशास्त्र संशोधन मंडळ, हें त्यांनी काढलें व स्वत: त्यास १०० रुपये दिले. ज्ञानेश्वरी मंडळ ज्ञानेश्वरीसंबंधी चर्चा करण्यास होतें. अशा प्रकारें निरनिराळया कामांत लोकांनी भाग घ्यावा म्हणून त्यांनी अनेक मंडळें स्थापिली. परंतु या मंडळापैकी किती कार्यकर्ती झाली ? किती मंडळांशी राजवाडे यांचा संबंध राहिला ? या अनेक मंडळांपैकी पुण्याचें भारत-इतिहास-संशोधकमंडळ, आरोग्य मंडळ व शिक्षा विचार मंडळ ही तीन मंडळेंच जिवंत आहेत. भा.इ.संशोधक मंडळ आतां मरणार नाही. त्यास प्रो.पोतदार यांसारखे उत्साही कार्यकर्ते लाभले आहेत. शिक्षा विचार मंडळाच्या पुण्यास मधून मधून सभा होत असतात; तसेंच आरोग्यमंडळ वझे व नंतर नुकतेच कैलासवासी झालेले भट यांनीं नांवारुपास आणिलें होतें. बाकीची मंडळें राजवाडे ह्यांच्या ह्यातीतच आटोपलीं व जी शिल्लक आहेत त्यां मंडळांजवळही त्यांचा संबंध उरला नव्हता. मंडळें स्थापन करणें हें एक काम व मंडळें चालविणें हें दुसरें काम, राजवाडे यांच्याजवळ तडजोड नसे. त्यांना आंगमोड व पदरमोड करणारी माणसें आवडत. कार्यार्थ ज्यांस तळमळ लागली आहे असे लोक त्यांस पाहिजेत. कार्य करण्याची त्यांची तडफ, त्यांचा उरक इतरांस नसे. इतरांच्या फावल्या वेळांत देशकार्य करण्याच्या प्रवृत्तीचा त्यांस संताप येई. व मग आपणच एकटे दुस-यांवर न विसंबतां आपल्याच सान्निपातिक तडफेनें व जोरानें काम करू लागत. रें रें करीत काम करणें हें त्यांस सहन होत नसे.

 

पुढे जाण्यासाठी .......