गुरुवार, आँगस्ट 06, 2020
   
Text Size

तीन मुले

मधुरीने ती बाळे पुढे नेली. मोतीला काप-या हातांनी मंगाने घेतले. वेणूच्या कुरळया केसांवरून त्याने हात फिरविला.
‘ठेव त्यांना तिकडे, आणि तू ये.’

मधुरीने मुले ठेवून दिली. ती आली. मंगाजवळ बसली. त्याचे डोके मांडीवर घेऊन बसली. आजीने मुलांना अंथरूण घालून दिले. सोन्यासह सारी मुले झोपी गेली. म्हातारी व बुधा खाली बसली होती. मधुरी मंगाजवळ होती.

‘मंगा, आम्हांला क्षमा कर.’ बुधा म्हणाला.

‘कसली रे क्षमा! तुम्ही माझे जणू भाग. वाईट वाटून घेऊ नका. खंत करू नका. मनाला लावून घेऊ नका, मला ही भीक घाला. मरताना ही एक गोष्ट मला द्या. म्हणजे मरणोत्तर मला आनंद मिळेल. रहाल ना आनंदाने! मधूनमधून माझी आठवण काढा. माझ्या आठवणी सांगा. परंतु रडायचे नाही, दु:खीकष्टी व्हायचे नाही. कबूल करा.’

‘मंगा, नाही हो आम्ही मनाला लावून घेणार. तू थोर मनाचा आहेस. तुझे समाधान ते आमचे. आपण तिघे एक, अभिन्न. खरेच एक-अभिन्न.’ मधुरी म्हणाली.

‘होय हो मधुरी. आजीला आता येथे नका राहू देऊ. आजी, तू आता मधुरीकडे राहायला जा. येथे बंदरावर एकटी भुतासारखी नको राहू. कबूल कर. जाईन म्हणून कबूल कर.’

‘जाईन हो. मधुरी जणू माझीच मुलगी. माझीच तुम्ही सारी. मंगा जाईन हो मोठया घरी राहायला.’

‘मी तर फार मोठया घरी जात आहे. देवाच्या घरी. तेथे सर्वांना वाव आहे. खरे ना! आता मला शांतपणे, पडू द्या. मधुरी, तुझ्या मांडीवर पडू दे.’
आणि सारी शांत होती. म्हातारीचा जरा डोळा लागला बुधालाही जरा गुंगी आली. मंगाने मधुरीकडे पाहिले. मधुरी खाली वाकली. खोल आवाजात मंगा म्हणाला.

‘माझी मधुरी, माझी मधुरी!’
‘होय हो मंगा, होय.’

‘जातो आता मधुरी; मधुरी, सुखात रहा.’
मधुरी मधुरी करीत व तिला आशीर्वाद देत मंगा देवाघरी गेला.

 

पुढे जाण्यासाठी .......

तीन मुले