शनिवार, जुलै 11, 2020
   
Text Size

तीन मुले

त्या दिवशी समुद्रास भरती आली होती. त्या लाटांकडे तिघे बघत होती.
‘मधुरी, मी जातो पाण्यात.’ मंगा म्हणाला.
‘संध्याकाळ होत आली. आता नको जाऊस.’ बुधा म्हणाला.
‘जाणार मी. जाणार.’ मंगा उडया मारीत म्हणाला.

आणि तो पाण्यात गेला. तो लाटांशी खेळू लागला. मध्येच मोठी लाट येई आणि मंगा दिसेनासा होई. दोन लाटांच्या मधल्या खळग्यात तो नाचत राही. जणू पाळण्यातच आहे. तरंगमय पाळण्यात. सागरसंगीत चालले होते. तरंगाच्या पालखीत बाळ नाचत होते. मंगा आनंदाने मस्त झाला होता. परंतु आता अंधार पडू लागला. पाण्यातील मंगा दिसेना. मधुरी हाका मारु लागली. परंतु समुद्राच्या गर्जनांमुळे ती हाक त्यालाच थोडीच ऐकू जाणार होती?

‘मधुरी, आपण चल जाऊ. मला घरी रागावतील. उशीर झाला.’
‘मंगाशिवाय आपण कसे जायचे?’
‘तो आपणास सोडून कशाला पाण्यात गेला?’

‘परंतु तो सुरक्षित येईपर्यंत आपणास थांबायला नको का?’
‘मला येथे भीती वाटते.’
‘मी आहे ना जवळ. माझा हात धर.’
मधुरीचा हात धरुन बुधा उभा होता. थोडया वेळाने मंगा आला तो कोरडे नेसला.

‘किती रे वेळ लावलास? आम्हांला काळजी.’ मधुरी म्हणाली.
‘काळजी कसली? समुद्र म्हणजे मला गंमत वाटते. हजारो हातांनी समुद्र मला खेळवतो, नाचवतो.’ मंगा म्हणाला.

‘येथेच उभी राहू आपण. अंधारात उभी राहू.’ मंगा म्हणाला.
‘मला घरी रागावतील.’ बुधा म्हणाला.
‘मला घरी रागावले तरी मी त्याची कधी पर्वा करीत नही.’ मंगा म्हणाला.
‘मला घरी बोलतात, परंतु मी मनावर घेत नही.’ मधुरी म्हणाली. शेवटी तिघे निघून गेली.

त्या दिवशी बुधाने खारका आणल्या होत्या.
‘बुधा, मजजवळ दे. मी वाटते.’ मधुरी म्हणाली.
‘मीच वाटतो.’ तो म्हणाला.
‘पण माझ्याजवळ दिल्यास म्हणून रे काय झाले?’ ती म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......

तीन मुले