शनिवार, ऑक्टोबंर 31, 2020
   
Text Size

श्यामची आई

इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरूषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली.

'बाळ, पाणी दे रे!' आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला.

'चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर.' असे आईने सांगितले. तसे पुरूषोत्तमाने पाणी पाजले.

'या जानकीबाई, या हो, बसा.' जानकीबाई समाचाराला आल्या होत्या.

'पाय चेपू का जरा?' त्यांनी विचारले.

'चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरेच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले.' आई म्हणाली.

'आवळयाची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल.' जानकीबाईंनी विचारले.

'द्या तुकडा आणून.' क्षीण स्वरात आई म्हणाली.

'चल पुरूषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे.' असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरूषोत्तमही
त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळयाची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरूषोत्तम जवळ बसला होता.

'जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी आता शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?' असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली.

पुरूषोत्तम बाहेर खेळावयास गेला.

तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखडयाने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळयावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळया म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुध्दा मधूनमधून बरे नसे.

'ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आई?' आईने नमूला विचारले.

'बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?' नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली.

'नमू, तुझ्याबरोबर पुरूषोत्तम येईल, त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले.' आई म्हणाली.

'बरे, हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर.' नमू म्हणाली.

'आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत.' आई म्हणाली.

'तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?' नमूमावशीने विचारले.

'नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे?' आई डोळयांत पाणी आणून म्हणाली.
'हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?' नमूने विचारले.

'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रूपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल.' आई सांगत होती.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई