शनिवार, ऑक्टोबंर 31, 2020
   
Text Size

श्यामची आई

'श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?' नमूने विचारले. 'त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?' आई म्हणाली.

नमुमावशी निघाली. 'कुंकू लाव, ग. तेथे कोनाडयात करंडा आहे.' आईने सांगितले. नमूमावशीने स्वत:च्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली.

'आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?' असे म्हणून पुरूषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली.

'इंदू ! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला.' आई पुरूषोत्तमास म्हणाली.
इंदूताईने पत्र वाचले व म्हणाली, 'मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन.' इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. 'पुरूषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल.' इंदू म्हणाली.

'जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो.' असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला.

'माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देत येत नाही. मी अभागी आहे. काय करू मी तरी?' वडील आईजवळ बसून म्हणत होते.

'हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत. तर धाकटया पुरूषोत्तमाने काय करावे? पुरूषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊन नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उडया मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळयांत मी येऊन बसेन हो.' असे आई बोलत होती.

'तू सुध्दा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील.' वडील म्हणाले.

'कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांस कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दु:खेही मला आनंददायकच वाटतात.' असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.

'पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने.' आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.

'तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो.' असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे पावन असे ते दृश्य होते.

इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या.

'या इंदूच्या आई, या.' म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला. केस जरा सारखे केले. 'पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?' त्यांनी विचारले. 'हो पत्र आले आहे. इंदूने वाचले.' आई म्हणाली.

'तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते.' राधाताई म्हणाल्या.

'सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत. तुमचा शेजार आहे. आणखी काय पाहिजे?' आई म्हणाली.

थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या.

मावशी पहाटे येणार होती. पुरूषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाडयांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणा-या बैलगाडया पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरूषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेडयाशी थांबली.

'आपल्याच बेडयाशी थांबली रे!' आजी म्हणाली. दुर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरूषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय मावशीच आली होती. पुरूषोत्तम करंडी घेऊन आला; वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला.

'आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली.' आईला हलवून पुरूषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते.

'आली? माझी वाट मोकळी झाली !' असे आई म्हणाली. अर्धवट शुध्द, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले.

'अक्का!' मावशीने हाक मारली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंत:करण ओतलेले होते.

'आलीस सखू, बस तुझीच वाट पहात होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!' आई रडू लागली.

'अक्का! हे काय वेडयासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरूषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे.' मावशी म्हणाली.

'नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच, माझ्या राजवाडयातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो सखू! तुला ना मूल, ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!' आई बोलत होती.

'अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं.' असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते.

मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई