शुक्रवार, ऑक्टोबंर 23, 2020
   
Text Size

श्यामची आई

रात्र एकेचाळिसावी

भस्ममय मूर्ती

आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, 'का, रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लौकर जातो; मग तुझा रे कसा नाही जात? ये, मला भेट.' सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाडया, किती दूरचा प्रवास!

मला वाईट वाटत होते. जिवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे, असे वाटे. परंतु पैसे?

मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवचं होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. 'यूयं वयं वयं यूयं' असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, 'अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया' देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दु:ख बोलतांही समजते. नामदेवाला माझे सुखदु:ख समजे.   माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो.

'नामदेव! मला घरी जावेसे वाटत आहे. आई फार आजारी आहे, असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे.' मी म्हटले.

'मग जा. भेटून ये.' तो म्हणाला.

'आईला डोळे भरून पाहून येईन! पण पैसे?' मी म्हटले.

'काल नाही का माझी मनीऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. दहा रूपये आहेत. तुला पुरतील? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा.' नामदेव म्हणाला.

थोडेसे सामान घेऊन मी निघालो, स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते.

'पत्र लगेच पाठव बरे, श्याम.' नामदेव म्हणाला.

'होय.' मी म्हटले.

'तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत.' तो म्हणाला.

'तू माझ्याबरोबर आहेसच.' मी म्हटले.

गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळयाआड झाला. गाडी सुटली व डोळयांतून पाझर सुटले- शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो.

बोरीबंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो, तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवीन्द्रनाथांची गीतांजली माझ्या हातांत होती.

'आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल.' हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणा-या सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुस-या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुस-या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग- दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई