बुधवार, ऑक्टोबंर 21, 2020
   
Text Size

श्यामची आई

हर्णे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हर्णे हर्णे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकटया बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी सातआठ तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो.

हर्णे बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यांत माणसे उतरली.

मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणी तरी माझ्याकडे पाहात होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती?

पडाव उभा राहिला. मी पटकन् उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी ! माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली.

'मावशी! तू इकडे कोठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते?' असे मी विचारले. मावशीच्या गंगा-यमुनांनी उत्तर दिले.

'मावशी! बोलत का नाहीस?' मी काकुळतीने विचारले.

'श्याम! तुझी आई, माझी अक्का, देवाजवळ गेली!' ती म्हणाली.

माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते.

'मला बोलावलेत ग का नाही? मला स्वप्न पडले, म्हणून निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोठची आई?
कायमची अंतरली आई! असे म्हणून मी रडू लागलो.

'श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे.

श्याम! दोन दिवसात अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार, नाही उगी, किती रडशील!' मावशी मला समजावीत होती.

'मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन, असे मी मनात म्हणे परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू?' मी म्हणालो.

'तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शीक; आमच्यासाठी शीक. जगासाठी शीक. आईला प्रेम देणार होतास, ते जगाला दे. जगातील दु:खी मातांना दे.' मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली.

'मावशी! तू परत निघालीस? मी विचारले.

'होय. तेथे माझ्याने राहवेना. तू घरी जा. उद्या तिसरा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका; म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये. गंगेत नेऊन टाकू.' मावशी म्हणाली. 'मावशी! मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी म्हटले.

'त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला, तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा' मावशी म्हणाली.

'श्याम! आलास का, थांब, हो, देवाला गूळ ठेवते, असे आता मावशी कोण म्हणेल?' मी म्हणालो.

'श्याम ! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली. तरी प्रेमरूप आई-स्मृतिरूप आई- तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल तुझ्यासाठी गाडी ठरवू.' असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरविली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली.

मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतून वर येत आहे, असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारूण्यमूर्ती! माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई