बुधवार, ऑक्टोबंर 21, 2020
   
Text Size

श्यामची आई

शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिण दिवा जवळ होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते.

'श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!' ते म्हणाले.

पुरूषोत्तम जागा झाला. 'अण्णा, अण्णा,' असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हांला कोणासही बोलवत नव्हते.

दूर्वांची आजी म्हणाली, 'तुझीच आठवण काढीत होती हो श्याम! तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती हो जगायला. परंतु नाही त्याची इच्छा.' मी ऐकत होतो.

अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात् करण्यात आला होता, तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जशाच्या तसा भस्ममय देह होता. वा-याने इवली देखेल मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुध्द असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती.

लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वत:च्या पत्नीच्या गळयात घालण्यासाठी नेले.

सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरूषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरूपुराण पुरूषोत्तम मजजवळ वाचीत असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनीसुध्दा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत.

आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळयांना आमंत्रण दिले. 'आला, एक कावळा आला, तो दुसराही आला,' चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडावर बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरटया घालीन; परंतु स्पर्श करती ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, 'आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही.' तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, 'आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर, वयनी, प्रेम करू.' तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, 'पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढयात दर्भाचा नका करू.'

नदीवरुन जड अंत:करणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना!

शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, 'यशोदे, काही काळजी नको करु. पुरूषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन.' काय चमत्कार ! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन् कावळा शिवला.

माझ्या डोळयात पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरूषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोडयाळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना ह्या संसारातील आईवरून येईल. स्वत:च्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोटया आईला ती जगन्माऊली पाठवीत असते.

गडयांनो! माझी आई मेली. तिने जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊभाऊ सारे प्रेमाने परस्परांस मदत करतील, श्रेष्ठकनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांस वाढवतील, पाळतील पोसतील, हसवतील, ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार! तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार!'

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई