रविवार, जुन 07, 2020
   
Text Size

श्यामची आई

श्याम या नाना रंगाच्या खडयांकडे पाहत बसला. या लहान खडयांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खडयांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.

गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.

'श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?' रामने विचारले.

'अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दूरूनच त्याला हात जोडीत असतो.' श्याम म्हणाला.

'मग काय आहे हातांत?' नामदेवाने विचारले.

'देवाच्या मूर्ती.' श्याम म्हणाला.

'तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?' भिकाने विचारले.

'हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत.' श्याम म्हणाला.

'पाहू दे, कसली आहे?' असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली.

'हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!' असे म्हणून श्याम दाखवू लागला.

'श्याम, आज बोलणार ना तू?' रामने विचारले.

'हो. त्या मुलांना मी सांगितले आहे. जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुध्दा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?' श्यामने विचारले.

प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला.

जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरूणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार? आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नमूमावशी वगैरे येत असत.

परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रूपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे.

'मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?' दूर्वांची आजी बोलत होती.

माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, 'नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका.'

त्या दिवशी आई पुरूषोत्तमला म्हणाली, 'पुरूषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग, तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण.'

पुरूषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली.

'यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?' ती प्रेमळ मुलगी म्हणाली.

'नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ    चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला, तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल.' आई म्हणाली.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई