सोमवार, जुलै 13, 2020
   
Text Size

श्यामची आई

'आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई ! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील, तसे मी करीन. राजीनामा. मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?' दादा गहिवरून बोलत होता.

आई विचार करून हळूच म्हणाली, 'गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रूपये पाठवत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ.'

दादा परत मुंबई जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला. 'जा, बाळ; काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे, असेच पत्र लिहा. उगीच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकांस कधी अंतर देऊ नका!' आईने संदेश दिला.

जड अंत:करणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला, संसार मोठा कठीण, हेच खरे.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई