गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

श्यामची आई

मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुल वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात! लहान लहान बटणेच जणू असे वाटते! बकुळीच्या फुलांच्या मी परडया भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुस-याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबाक्षीवरचीही फुले मी आणीत असे. कारण त्यांना ती थोडीच हवी असत? फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबडया नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील! फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी. नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत.

आज मी  फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी-सौंदर्यमयी मूर्ती, असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हावयाची. गुलबाक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पीतांबरी, लाल, पांढरी, शिट्कावाची कितीतरी प्रकार! गुलबाक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबाक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करितात. त्याला सुईदोरा लागत नाही. या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोडयाची माळ. दुहेरी माळ. बायका निरनिराळया त-हेने ती गुंफतात.

त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावयास जात असू. पाटीदप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुध्दा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की, आज आपण सारी फुले आणावयाची. लौकर जाऊन कळयाच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फूलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले.

बाहेर ऊन होते तरी मी निघाले. एक फडके बरोबर घेतले होते, तीन वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळया मी तोडल्या. गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळयांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणिले. घरी आल्यावर मी एक ताम्हन घेतले व त्यात पाणी घालून कळया टाकून ठेविल्या.

संध्याकाळी आई म्हणाली, 'आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एकसुध्दा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही; पण धुपारतीला तरी चार आणून ठेव.'

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई