सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

श्यामची आई

मुले गेली. माझे तोंड गोरेमोरे झाले होते. आई मला म्हणाली, 'श्याम! दुस-याच्या घरची फुले त्यांना न सांगता-सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी; परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास; परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फु लू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळया किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळयांना जीवनरस पाजीत असतात, त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळया चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील. बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना? कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे; परंतु नीट फुललेले वहा.'

'गडयांनो ! अशा खुडून आणलेल्या मुक्या कळयांबद्दल मातेलाच वाईट वाटेल. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात. रसमय, गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळया नीट फुलत नाहीत. अर्धवट कामे नीट फुलत नाहीत, फळत नाहीत. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके, संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, 'श्याम ! मुक्या कळया नको हो तोडू, त्यांना फुलायला संधी दे. त्यांना नीट फु लू दे.' '

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई