मंगळवार, सप्टेंबर 21, 2021
   
Text Size

श्यामची आई

रात्र पहिली

सावित्री - व्रत

आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात 'मला काय त्याचे' अशा काळात, असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला- साचीव जीवनाला- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय.

गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळयांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केली:

"माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे !

"माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वत:ला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई