गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

श्यामची आई

"माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही; परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकली नाही की, तर त्यांना वाटे हे कुणबट माजले ! कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला म्हारडा म्हणावयाचे, अशी ही पध्दत ठरलेली ! असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तान्ध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.

"वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला; तथापि, त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तो-यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल; जे लावाल ते फोफावेल, फळेल.

"एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, 'कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.' ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले.

घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, 'भाऊदा! तिन्हीसांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला रहा. कोंबडयाला उठून थंड वेळेस जा.' भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, 'म्हाता-ये ! अग, पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन. दूध काढतात, तो घरी पोचेन.'

भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द 'जाऊ नका' सांगत होता. फळणारी पापे 'चल, राहू नको', म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले.

वडवली गावापासून दीड कोसावर एक प-ह्या होता. पावसाळयात त्याला उतार होत नसे. तो प-ह्या खोल दरीतून वहात होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुध्दा असे. तेथून दिवसाढवळयाही जावयास नवशिक्यास भय वाटे ! परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भुतेखेते, जीवजीवाणू, कसलेच भय त्यांना वाटत नसे.

भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोटया बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले. झटकन् गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फूत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, 'अरे, बामणाला मारले, खोताला मारले, रे, धावा !' ते मांगही जरा भ्यायले.

भाऊ त्या मांगांना म्हणाले, 'नका रे मला मारू ! मी तुमचे काय केले? सोडा मला. ही आंगठी, ही सल्लेजोडी, हे शंभर रुपये घ्या. सोडा मला!' दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई