गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

श्यामची आई

म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे, असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या आंगठया, ती सल्लेजोडी, ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते. पण दारिद्रयामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वत:च्या मुलाबाळांच्या प्रेमाने, त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून, ते मांग तो खून करू पहात होते. कोणी म्हणतात की, जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युध्द नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाब-या घाब-या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.

घरात बातमी येताच आकान्त झाला. सा-यांच्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सा-यांची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा ! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे ! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर   कु-हाड नको पडू देऊ ! मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा! माझी करूणा येऊ दे तुला, तू करूणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरुन; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने! नकोत ती मोठी वस्त्रे! कशाला मेली ती खोती! नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा.' असे म्हणून आई विनवू लागली. रडू लागली.

आईने देवाला आळविले, प्रार्थिले; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री-पुरूष रत्ने आहेत! राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल. मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो.

माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहाणा-या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो. आधार देवो, वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई