गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

श्यामची आई

मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई! तुला माझा राग आला होय. तुला वाईट वाटले?' असे केविलवाणे मी विचारले.

"नाही हो बाळ. मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम!' आई म्हणाली.
गडयांनो ! मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. 'पाप करताना लाज वाटू दे चांगले करताना लाज नको!'

रात्र दुसरी

अक्काचे लग्न

आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत.

गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते.

"चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल.'

श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला 'गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन:

'यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे ।
गोपीनाथा आल्ये आल्ये सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू, जरा थांब रे'

"गोविंदा! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळयात मी गोवा-यांबरोबर रानात जात असे. गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी; पण तिच्यात केवढी शक्ती! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. दोन रूपये त्यांना पडतात. परंतु खेडयापाडयांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेडयांत ते वाजविले जात आहे! वाजव, आळव ते गीत.'

 

पुढे जाण्यासाठी .......

श्यामची आई