गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

इंदूरकडे प्रस्थान

आज घनाची खटला होता. कोर्टात चिक्कार गर्दी होती. मॅजिस्ट्रेट ताबडतोब निकाल देणार, अशी अफवा होती. मालती नि सखाराम तेथे होती. रामदास, ब्रिजलाल, पंढरी, मार्तंड, गंभीर – सारे होते. अत्याचारास उत्तेजन देणे, धर्मिक भावना दुखवणे, इत्यादी आरोप त्याच्यावर होते. घनाच्या भाषणांतील काही उतारे वाचून दाखवण्यात आले.

सरकारी वकिलांचे भाषण झाले. त्यात ते म्हणाले, “अहो, अशी भाषणे म्हणजे अत्याचारास उत्तेजन होय. तुम्ही मालकालाच चोर म्हणता. मग दुसरा कोणी म्हणेल, जर हे चोर असतील तर बदला त्यांना. आपल्या शब्दांचे दूरवरचे परिणाम होत असतात. मालक म्हणजे समाजाला जडलेला महारोग, मालक म्हणजे विषारी साप, -- अशा उपमा तुमच्या भाषणात आहेत. तुम्ही साप म्हटलेत तर दुसरा सापाला ठेचायला धावेल. बिचारा तो फाशी जाईल, परंतु त्याच्या मनात हे भरवणार कोण? तुम्ही सारे शांती बिघडवणारे.”

वकिलाचे केवढे थोरले भाषण झाले. ठरीव पद्धतीप्रमाणे साक्षीपुरावे झाले.

घनाने वकिल वगैरे दिला नव्हता. त्याने स्वत:च बाजू मांडली. तो म्हणाला, “मी विषारी साप म्हटले, परंतु पुढच्याच वाक्यात सापाचे विषारी दात काढले म्हणजे तो निरुपद्रवी खेळणे होईल, असे म्हटले. मालकाच्या हातातील संपत्तीची सत्ता काढून घेणे हा त्याला उपाय. त्यात मी कोणती वाईट गोष्ट सांगितली? हे भांडवलदार, कारखानदार, त्यांना माणुसकी नाही. केवळ नफा म्हणजे त्यांचे दैवत. समाजद्रोहाचे पाप ते अहोरात्र करीत आहेत. त्याना तुरुंगात का बसवीत नाही? समाजाच्या अशांतीला खरोखर ते कारण आहेत. आज साखर नाही, आज रॉकेल नाही, आज आगपेटी नाही, -- हा चावटपणा कोण करतो? या दगलबाजांचे पारिपत्य सरकार करीत आहे का? ईश्वरासमोर कोण दोषी ठरेल, कोण अपलाधी ठरेल? म्हणे मी धार्मिक भावना दुखावतो. धर्माचा आत्मा म्हणजे सर्वांना सुखी करणे. तो खरा धर्म समाजात यावा म्हणून आमची धडपड. तर आम्हीच धर्मघातकी म्हणून संबोधण्यात येते! उलटा न्याय!”

घनाचे भाषण दोन तास झाले. जणू नवधर्माचे ते निरूपण होते. मानवतेवरचे ते प्रबोधक प्रवचन होते. जणू कोर्टात सभाच भरली होती.

 

पुढे जाण्यासाठी .......