बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

सीमोल्लंघन

संप सुरू होऊन जवळ जवळ महिना झाला. कामगारांची दुर्दशा होती. खेड्यापाड्यांतून थोडीशी धान्याची मदत झाली. परंतु शेतक-याजवळ जादा धान्य अलीकचे फारसे शिल्लकच नसे. रेशनिंगचे दिवस. दुकानांतून रोखीने आणावे लागे. रेशनिंगमध्ये उधारीने कोण देणार? इतर माल कदाचित कोणी उधारीने दिला तरी रेशनिंगचे काय? जवळ दिडकी उरली नाही, थोडा फंड अजून शिल्लक होता. त्यातून गरीब लहान मुलांना दूध देण्यात येई. डाळे-मुरमुरे वाटण्यात येत. परंतु वेळ कठीण आली होती. मालक काहीच करायला तयार नव्हाता. सरकारही स्वस्थ! काय करावे हा प्रश्न होता.

रात्री सभा भरली होती. घनाने सारी परिस्थिती समजावून दिली. तो म्हणाला, “आपल्याजवळ पैसे नाहीत. फंड संपत आला. मुलाबाळांचे हाल मी बघत आहे. आज माझ्या एका पुस्तकाला पाच हजारांचे बक्षीस मिळाल्याची तार आली आहे. ते बक्षीस मी तुमच्यासाठी देतो. आणखी पाच दिवस जातील. परंतु पुढे काय? बंधुभगिनींनो, मी तुमच्यापुढे एक धाडशी विचार ठेवू इच्छितो. तुम्ही मजबरोबर येता का? कशाला या गिरणीत राहता? येथे माणुसकी नाही, कदर नाही; -- तेथे कशाला राहता? तिकडे इंदूर संस्थानात पडित जमिनी आहेत. माझे मित्र पुढे गेले आहेत. तेथे आपण नवीन वसाहत वसवू. सोने पिकवू. कस न गेलेली जमीन भरपूर पीक देईल. विजेच्या शक्तीवर माग चालवू. इतर कामे करू. एक सहकारी जीवन निर्मू, नवीन संस्कृती निर्मू. तेथे सामाजिक, आर्थिक समता स्थापू. शिक्षणाचे नवे प्रयोग करू. मानव म्हणून जगू.  इतर भेद जमीनदोस्त करू. येता माझ्याबरोबर? नवभारत साहसांची अपेक्षा करीत आहे. विधायक साहस, सृजनशील साहस! येथून जाताना वाईट वाटेल. जुन्या आठवणी, जुने संबंध, परंतु एके दिवशी सारेच सोडून जायचे असते. जुन्याला चिकटून बसण्यानेच आपण भिकारी झालो. आपले गाव सोडायचे नाही, जुन्या रूढी सोडायच्या नाहीत, जुने विचार सोडायचे नाहीत, -- असे करून का प्रगती होते? जीवनात सतत सीमोल्लंघन करू तरच सोने एकमेकांस देता येईल. जुन्या सीमा ओलांडून पुढे जायचे नवी क्षितिजे, नवीन आदर्श! बघा विचार करून. माझ्या डोळ्यांसमोर तरी सुंदर चित्र दिसत आहे. ती पाहा नवीन वसाहत. सर्वांना घरे आहेत. तो मध्ये मोठा चौक.

 

पुढे जाण्यासाठी .......