शुक्रवार, मार्च 05, 2021
   
Text Size

सीमोल्लंघन

त्याने सारी शेती पाहिली. तो प्रसन्न झाला.

रात्री सर्वांना जमवून तो म्हणाला, “काळ बदलला आहे. राजे-रजवाड्यांचे युग जात आहे. इंदूर वगैरे संस्थाने विलीन होऊन एक नवीन प्रांत बनवला जाईल. परंतु जो नवे मंत्रिमंडळ येईल ते तुमच्या प्रयोगास सर्वतोपरी मदत देईल. मी दिल्लीला अनेकांना भेटून तुमच्या प्रयोगाची माहिती त्यांना सांगितली. सर्वांनी तुम्हांला धन्यवाद दिले आहेत. आणि तुम्ही परित्यक्त मुसलमान बंधुभगिनींनाही आपल्यात घेतलेत, हे ऐकून गांधीजींचे डोळे आशेने चमकले! तुमच्या या प्रयोगाला त्यांनी शुभ इच्छिले आहे. आणखी काय पाहिजे? असेच येथे खपा. बाहेरची शेती करा नि हृदयाची करा. शेती उभय प्रकारची असते. ज्वारी-बाजरी-गव्हाची ही बाहेरची शेती, आणि प्रेम, दया, धैर्य, ज्ञान, यांची मानसिक शेती. दोन्ही पिके येथे मस्त येवोत.”

अमरनाथ गेला.

थोड्या दिवसांनी वसाहतीचा पहिला वाढदिवस आला. परंतु देशातील परिस्थिती लक्षात घेऊन तो साजरा करण्यात आला नाही. दिवस जात होते. गांधीजींच्या उपवासाची, बाँब फेकल्याची आणि अखेर त्यांच्या खुनाची, -- अशा हृदयद्रावक वार्ता आल्या. सर्वांची तोंडे सुकून गेली. एक दिवस सर्वांनी उपवास केला.

सखाराम म्हणाला, “गांधीजींनी दु:ख गिळून कर्तव्य करायला शिकवले आहे. ते आपण करीत राहू. आपण येथे नीट नांदू तर ते आपल्याजवळ आहेत असा अनुभव येईल.”

काही दिवस वातावरण उदास होते. परंतु कामात पुन्हा सारे रमले. दुसरे वर्ष सुरू झाले होते. मालती लहान मुलांमुलींना शिकवी. ती त्यांच्या बरोबर काम करी, त्यांना गोष्टी सांगे. गाणी शिकवी. मोठ्या माणसांना सखाराम, घना हे शिकवीत. कोणी निरक्षर रहायचे नाही असा संकल्प होता. पार्वतीने तर ध्यास घेतला शिकण्याचा. ती आता वर्तमानपत्रे वाचू लागली होती.

वसाहतीला रंगरूप येत होते. नव-सृष्टी, नव-संस्कृती निर्माण होत होती.

श्रमणा-या, धडपडणा-या ध्येयार्थी जीवांनो, श्रमा. तुमची धडपड वाया जाणार नाही!

 

पुढे जाण्यासाठी .......