बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

नवजीवन

‘सार्वजनिक सेवा म्हणून धंदा सोडून आलो. नुकसान झाले तरी सहन केले पाहिजे. सरकारी कामासाठी यायला हवे.’ एकजण म्हणाला.

‘आणि ज्यूरीत यायचे नाकारले तर, सरकारी अवकृपाही व्हायची.’ दुसरा म्हणाला.

‘ज्यांचे उठल्या-बसल्या सरकार दरबारी काम असते त्याने सरकारला नाखूष करून कसे चालणार?’ तिसरा म्हणाला.
ज्यूरीतील त्या सभ्यांची बोलणी हवा, बाजारभाव, वाढते गुन्हे, इत्यादी विषयांवर चालली होती. प्रतापरावांची कोणी कोणी ओळख करून घेत होते; कारण त्यात त्यांना स्वत:चा गौरव वाटत होता. आपल्यापेक्षा हे कोणी तरी बडे असावेत असे त्यांना वाटले. कारण प्रतापराव रूबाबदार होता. त्याचा पोषाख किमती होता. त्याला अनेक भाषा येत होत्या. त्यालाही वाटत होते की, यांनी मला मान दिलाच पाहिजे. मान घेण्याचा आपला जणू हक्क आहे असे त्याला वाटले. ज्यूरीपैकी एकजण त्याच्या बहिणीच्या मुलांना शिकवायला जात असे. तो अतिपरिचय दाखवू लागला. अधिक बडबड करू लागला. प्रतापरावाला ते आवडले नाही.

‘तुम्हीसुध्दा या ज्यूरीत?’ असे म्हणून तो हसला.

‘निसटून जाता येईना.’ प्रतापरावाने तुटक उत्तर दिले.

‘मी निसटण्याचा प्रयत्न केला नाही.’ मोठेपणाचा अविर्भाव दाखवीत तो शिक्षक म्हणाला.

‘चांगले केलेत. यालाच सार्वजनिक सेवेची वृत्ती, खरी धर्मपर वृत्ती असे म्हणतात. परंतु ही वृत्ती फार टिकत नाही. भूक लागू दे, झोप यायला लागू दे, म्हणजे मग ही सार्वजनिक कामे म्हणजे ब्याद वाटते. नको ही पीडा असे वाटते.’ प्रतापराव म्हणाला.

ज्यूरीतील एकजण अजून यावयाचा होता. मुख्य न्यायाधीशही अजून आले नव्हते. परंतु लौकरच ते आले. खटला पटकन् संपवून त्यांना जायचे होते.
‘ते गृहस्थ अजून कसे आले नाहीत? नेहमीच ते उशीर करतात. सरकारी कामात उशीर करायला यांना लाजही वाटत नाही.’ न्यायाधीश पुटपुटले. हे न्यायाधीश धिप्पाड होते. विवाहित होते तरी व्यभिचारी होते. त्यांची पत्नीही त्यांच्याप्रमाणेच प्रेमलीला करी. खटला संपवून त्या न्यायाधीशास एका तरूणीला भेटायला जायचे होते. केव्हा एकदा खटला सुरू होऊन आपण जाऊ असे त्यांना झाले होते. कपाळाला आठया घालून ते बसले.

इतक्यात ते उशीर करणारे गृहस्थ आले. सरकारी वकीलही आले. इतर आरोपींचे वकील होते, परंतु रूपाचा वकील नव्हता.

‘आज प्रथम कोणता खटला?’ न्यायाधीशांनी विचारले?

‘विष प्रयोगाचा.’

‘तयारी आहे तुमची?’

‘हो.’

सरकारी वकिलांची तयारी नेहमीच असे. तो रात्री अनेक पत्रे लिही. थोडेफार कामकामाविषयी पाहून ठेवी. दारू पिई. विषप्रयोगाच्या खटल्यातील त्याने काहीही पाहून ठेवले नव्हते. न्यायाधीशांनी दुसर्‍या एका खटल्याविषयी विचारले; परंतु साक्षीदार नव्हते म्हणून तो बाजूला ठेवण्यात आला; आणि विषप्रयोगाच्या खटल्याचे काम सुरू झाले.

 

पुढे जाण्यासाठी .......

नवजीवन