बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

नवजीवन

प्रतापला हे सारे पाहून शिसारी आली. हे तुरुंग की नरक असे त्याच्या मनात आले. सारा दंभ, सारे निर्जीव, निष्प्राण, विवेकहीन काम. रद्दी सरकारे, रद्दी संस्था, रद्दी कारभार, मंडळी ऑफिसात आली.

‘मी जातो.’ प्रताप म्हणाला.

‘बसा, शेरा लिहा.’ जेलर म्हणाला.

‘मी साधा मनुष्य. शेरा ही मंडळी देतील. त्यांना समजते सारे. अच्छा, नमस्ते.’ असे म्हणून प्रताप निघाला. तो बाहेर पडला. दिवसभर त्या नदीतीरी तो भटकत राहिला. रात्री एका हॉटेलात तो आला. एक खोली त्याला देण्यात आली. त्याला झोप येत नव्हती. खोलीत तो फेर्‍या घालीत होता. रूपाचा प्रश्न निकालात निघाला होता. रूपाला आपली जरूर नाही हे मनात येऊन त्याला वाईट वाटले, लाज वाटली. परंतु दुसरा महान् प्रश्न त्याच्या डोळयांसमोर उभा तो. ते तुरुंग, रमणचे ते मरण, जगातील अन्याय, विषमता! कसे सोडवायचे हे प्रश्न?

फेर्‍या घालून तो दमला. तो तेथील खुर्चीत बसला. तेथे दिवा होता. त्याच्या खिशात धर्मप्रसार नावाचे छोटे पुस्तक होते. जीवनाचे साधे सुंदर नियम तेथे होते.

१.    कोणाची हिंसा नको करू. सारे तुझे भाऊ. जगात कोणाला हिडीसफिडीस नको करू. परमेश्वरी अंश सर्वांत आहे. परमेश्वराची प्रार्थना करण्याआधी कोणाजवळ भांडला असलास तर ते भांडण आधी मिटवून मग प्रार्थना कर.
२.    व्यभिचार नको करू. कामावर विजय मिळवल्याशिवाय राम नाही. एखाद्या स्त्रीवर प्रेम केले, एखाद्या स्त्रीशी लग्न लावलेस तर तिचा कधी त्याग नको करू. तिच्याशी निष्ठेने राहा. परविया नारी मातेसमान मान.

३.    सूडबुध्दी मानवाला शोभत नाही. अपकाराची फेड उपकाराने कर. सर्वांची सेवा कर. सारे सहन कर.

४.    शत्रूंवरही प्रेम करायला शीक.

अशी चार सूत्रे त्यात होती. त्याने ते चिमुकले पुस्तक मिटले. त्या चार सूत्रात सारे विश्वब्रम्हांड आढळले. आजवर जे त्याला अंधुक वाटत होते ते सारे स्पष्ट झाले. स्पंज पाणी शोषून घेतो त्याप्रमाणे त्याच्या जीवनातील अन्तर्बाह्य अणुरेणू तो संदेश जणू ओढून घेत होता. सारे जीवन संस्फूर्त होत होते.

बगिच्यात काम करणार्‍यांना वाटते ही फळे-फुले आमची. परंतु ती चूक असते. ती फळेफुले धन्याची असतात. त्याप्रमाणे आपली जीवने आपली नाहीत. ती ठेव आहे. प्रभूची ठेव. जीवनाचा मळा पिकवून तेथे प्रेम, स्नेह, सहानुभूती यांची फळेफुले पिकवून ते पीक प्रभूच्या, त्या विश्वंभराच्या चरणी समर्पावयाचे. प्रतापला वाटले, ‘एक जीवन संपले. नवजीवन सुरू झाले.’ त्याला मोकळे वाटले. हृदयावरचा बोजा उतरल्यासारखे वाटले. त्याने भक्तिभावाने प्रणाम केला नि म्हणाला,

“प्रभो, तू माझा सांगाती हो,
केला पण चालवी माझा.”

 

पुढे जाण्यासाठी .......

नवजीवन