बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

नवजीवन

प्रतापने रूपाला ओळखले. तो चकित झाला. जिला आपण मोहात पाडिले, जिला भोगले नि दूर फेकले तीच ही मुलगी. त्याला सत्याचा अभिमान होता; परंतु या मुलीची त्याने वंचना केली होती. तो तिला विसरून गेला होता. रूपाच्या चेहर्‍यावर विशिष्ट व्यक्तिमत्वाचा ठसा होता. कोठेही ती उठून दिसली असती; निराळी दिसली असती. तिचा चेहरा जरा फिक्कट दिसत होता. तरीही त्याच्यावर एक प्रकारची मधुरता होती. तिच्या ओठांवर मंद स्मित होते. तिच्या डोळयांत एक अपूर्व चमक होती. तिच्या आवाजात अकपटता होती.

‘तुझे घराणे कोणते? वडिलांचे नाव?’ प्रश्न करण्यात आला.

‘मी बेवारशी आहे.’ ती म्हणाली.

थोडा वेळ सारे स्तब्ध होते.

‘तुझी जात?’

‘मी मजूर आहे.’

‘तुझा धंदा?’

‘मी त्या विशिष्ट संस्थेत असते!’

‘कोणती संस्था?’

‘ती तुमच्यापैकी पुष्कळांना माहीत आहे.’ ती सस्मितपणे म्हणाली.

तिच्या त्या उत्तराने क्षणभर तेथे शांती पसरली. तिच्या त्या उत्तरात एक प्रकारची करूणा होती नि कठोरताही होती. त्यात भीषणताही होती. ‘तुझ्यावर कधी खटला झाला होता?’

‘नाही.’

‘आरोपपत्र मिळाले?’

‘हो.’

‘बसा खाली.’

साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. नंतर डॉक्टरांची शास्त्रीय परिभाषेत साक्ष झाली. आरोप वाचून दाखविण्यात आले. आरोप ऐकताना ज्यूरीपैकी कोणी जांभया दिल्या. तिकडे रामधन सुपारीचे खांड चघळीत होता. रमी सरळ मान ठेवून बसली होती. परंतु रूपा एकदम चमकते, दु:खी होते. काही देण्यासाठी ती उस्तुक दिसते. ती घाबरते, बावरते. ती मध्येच खाली बघे, लाजेने मरे. हात कुस्करीत बसे. तिने प्रतापरावावर दृष्टी खिळवली. तिने का त्याला ओळखले? नाही. त्याची स्मृती तिने आपल्या जीवनात खोल खाली दडपून टाकली होती. प्रतापच्या हृदयात तुमुल युध्द सुरू झाले.

 

पुढे जाण्यासाठी .......

नवजीवन