रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

हिमालयाची शिखरे

आणि भारताचा विजयी सुपुत्र घरीं आला. मायभूमीनें अपूर्व स्वागत केलें. विवेकानंद धर्ममूर्ति होते. परंतु त्यांचा धर्म रानावनांत जा सांगणारा नव्हता. सभोंवती दुर्दशा असतांना हिमालयांत कोठें जायचें ? महान् फ्रेंच साहित्यिक रोमारोलां याने विवेकानंदांवर एक ग्रंथ लिहिला आहे. त्यांत तो म्हणतो, “ Vivekanand was first a nation builder then a religious reformer ” विवेकानंद हे आधीं राष्ट्रनिर्माते होते. मग धर्मसुधारक होते. विवेकानंदांचा धर्म राष्ट्राची उभारणी हा होता. भारतावर त्यांचे अपार प्रेम. ते म्हणतात,  माझ्या बालपणाचा पाळणा म्हणजे ही भारतभूमि, माझ्या तरुणपणांतील उत्साहाची, आशा आकांक्षांची कर्मभूमि म्हणजे भारतभूमि, आणि माझ्या उतार वयांतील मोक्षाची वाराणसी म्हणजे हीच भारतमाता. तिचे सारें सारें मला प्रिय आहे. ये पंडिता, तू मला प्रिय आहेस, कारण तू भारताचा आहेस. आणि ये अज्ञानी बंधो, तूहि ये, मला प्रिय आहेस कारण तू भारताचा. सुष्ट वा दुष्ट, ब्राम्हण वा चांडाळ, सारे सारे मला प्रिय. सर्वांना मी हृदयाशी धरीन. सर्वांवर प्रेम करीन.

भारताची दुर्दशा पाहून कासावीस होत. एकदा अमेरिकेंत कोटयाधीश कुबेराकडे ते होते. रात्रीं सुंदर पलंगावर ते निजले होते. तेथलें तें वैभव, तो थाटमाट आणि स्वामिजींना झोप येईना. त्यांना सारखें रडूं येत होतें. उशी भिजून गेली. तो पलंग त्यांना निखा-याप्रमाणे वाटू लागला. ते जमिनीवर झोपले. सकाळीं मित्रानें विचारलें, “ उशी ओलीचिंब कशानें ?” “ मी रात्रभर रडत होतो. अमेरिकेंत केवढें वैभव. आणि भारतांत पाटभर खायलाहि नाहीं.” ते एका पत्रांत लिहितात, “आपण हिंदुस्थानांत पाप केलें. त्या पार्थसारथी गोपालकृष्णाच्या भूमींत स्त्रियांची, अस्पृश्यांची पशूहूनहि वाईट स्थिति आपण केली आहे.”  अमेरिकेंतील लोकांना ते म्हणायचे “ कृपा करुन हिंदुस्थानला मिशनरी नका पाठवू. मोठमोठीं धर्म तत्त्वें आईच्या दुधाबरोबर तेथें मुलांना मिळतात. रस्त्यांतील भिकारी महान् धर्मतत्त्वें सांगणारीं गाणीं म्हणत जातात. मूठभर भिक्षा घेऊन सर्व भारतभर उदारधर्म पसरवीत असतात. भारताला तुम्ही संसार सुंदर करणारें विज्ञान, पोटभर जगता येईल असें धंदेशिक्षण द्या.”

मार्गारेट ई नोबल हया इंग्रजीबाई विवेकानंदांना लंडनमध्यें भेटल्या. “ मी तुमच्या देशासाठीं काय करु शकेन ?” असे त्या ब्रम्हचारिणी विदुषीनें विचारलें. विवेकानंद म्हणाले, “ माझ्या देशांतील मायभगिनींस शिकवायला या. कलकत्त्यांत एखादी स्त्रियांची शाळा काढा.” आणि निवेदिता देवींनी कलकत्त्यास येऊन शाळा काढली. विवेकानंदांनीं १८९९ मध्यें रामकृष्ण मिशन संस्था काढली. स्वत:च्या मोक्षासाठीं व जगाच्या हितासाठी ही संस्था होती. किंबहुना जगाच्या हितांतच स्वत:चा मोक्ष असे ही संस्था सांगत आहे. विवेकानंद बेलूर मठांत संन्यासधर्मावर बोलतांना म्हणाले, “ संन्यास म्हणजे मरणावर प्रेम. रोज परसेवेंत झिजायचें, तिळतिळ मरायचें. अशा मरणांत मोक्ष असतो. देहाची आसक्ति नष्ट करणे, बारिक सारिक कर्मांतसुध्दा त्यागाची भावना जागृत ठेवणें म्हणजे संन्यास. एखाद्या क्षणीं अत्युच्च विचारांत रममाण होऊन सारें वैभव तृणवत् दूर फेंकाल तर दुस-या क्षणीं कच-याची टोपली उचलून सारें स्वच्छ कराल.”

 

पुढे जाण्यासाठी .......

हिमालयाची शिखरे