गुरुवार, जुन 04, 2020
   
Text Size

हिमालयाची शिखरे

तुरुंगांतून बाहेर आल्यावर त्यांच्या मनांत प्राणयज्ञाची कल्पना खेळत होती. एकदां म्हणाले, “गंगेच्या तीरावर असतांना ही कल्पना मला सुचली. अहिंसा प्रभावी व्हायला अहिंसक सेनाहि हव्यात. हजार हजार माणसांनीं ध्येयार्थ प्राण फेकावे.” स्वत: मुळा-मुठा संगमावर जलसमाधि घेण्याचा निर्णय घेतला. देशांतील भेद जावेत, हिंदु-मुसलमान ऐक्य यावें म्हणून, परंतु मित्रांच्या आग्रहानें म्हणा किंवा प्रभूच्या कृपेनें म्हणा सेनापतींनीं संकल्प दूर ठेवला.

१९३८ मध्यें धुळयाची गिरणी तीन दिवसांत उघडली नाही तर तापींत उडी घेईन असें मी घोषित केलें. सेनापति धांवत आले. म्हणाले, “ गुरुजी मरणार असतील तर मलाहि मेलें पाहिजे.”  परंतु गिरणीचा प्रश्न सुटला.

दुस-या महायुध्द काळांत प्रचार सभांतून सेनापति युनियन जॅक जाळायचे. म्हणायचे, “ इंग्रजांच्या स्वातंत्र्याची ही खूण म्हणून मी आदरानें तिला आधी ओवाळतो आणि आपल्या पारतंत्र्याची खूण म्हणून आतां जाळतो.”

अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरांत प्रवेश मिळावा म्हणून मी महाराष्ट्रभर हिंडत होतो. त्यावेळीं सेनापति माझ्याबरोबर होते. त्यावेळच्या किती आठवणी.

रस्त्यांत अपार धूळ. आम्ही नाकावर रुमाल धरायचे. सेनापति म्हणायचे, “ उद्यां अमेरिकेंत शोध लागेल कीं धुळींत व्हिटॅमिन आहे. सुंदर धूलिकणानें भरलेल्या बाटल्या येऊं लागतील. मग त्या तुम्ही नाकांत कोंबाल. हें शरीर मातीचेंच आहे. जाऊं द्या थोडी धूळ नाकात.”

तात्यांना मुलें म्हणजे प्राण. अनेक ठिकाणीं जेवायला वेळ असला कीं जवळच्या मुलांना म्हणायचे, “या गोटया खेळूं या. तुमचा नेम नीट लागला तर बैदुल बक्षीस देईन.” तात्यांना दिसतें कमी. तरी ते अचूक नेम मारीत.

तात्या अंतर्बांहय स्वच्छतेचे भोक्ते. सफाईचें काम करायचे. एकदा एका गांवी त्यांचे कपडे एका मुलानें त्यांना न कळत धुतले. पण नीट धुतले नाहींत. सेनापतींनीं दुस-या गांवीं गेल्यावर ते स्वत: परत धुतले. म्हणाले, “ काम करतों म्हटलें तर नीट केलें पाहिजे.” त्यांचे म्हणणें किती खरें !

सेनापति श्रीहरीचे चेले. म्हणायचे, “ तो श्रीहरि मला सांगतो, तो मजजवळ बोलतो.”  मार्क्सवादी मित्रांना म्हणायचे, “तुमच्या सर्व प्रयोगांच्या मागें माझा श्रीहरि मी ठेवीन.” परंतु ते आग्रही नाहींत. ते खरोखरच सारें नाटक समजतात. हीं माणसें म्हणजे नाना प्रकारचीं पात्रें. गांधी खून खटल्यांत त्यांनीं सावरकरांच्या बचाव निधीला मदत केली. आर्थिक अडचणीमुळे सावरकारांना आपला बचाव करता आला नाहीं असें होऊं नये म्हणून. महात्माजींच्या खुनानंतर सेनापति जिवंत समाधि घेणार होते. देशांतील द्वेष-मत्सर शमावेत म्हणून.

तात्या शब्दाला जागणारे. एक दिवस मी मुंबईत राहतों तेथें आले होते. तेथें विश्वनाथ नांवाच्या तामिळ बि-हाडकरुच्या मुलानें फार आग्रह केला तेव्हां म्हणाले, “ परत कधीं तरी येईन.”  आणि खरेंच एक दिवस उजाडत आहे. म्हणाले, “ येईन म्हटलें होतें. आलों. मुलांना दिलेला शब्द पाळावा. माणसें खोटें बोलतात असें त्यांना वाटता कामा नये.”

सेनापतींचा स्वभाव फार विनोदी. थोर सेवक हरिभाऊ फाटक नि सेनापति एकदां पुण्याच्या रस्त्यांतून चालले होते. रस्त्यांतला कोणताहि देव दिसला कीं हरिभाऊ चप्पल काढून नमस्कार करायचे. तसा त्यांनीं केला. सेनापति म्हणाले, “ हरिभाऊ, देव दिसताच अगदी चप्पल काढता ! ”

अज्ञातवासांतून आल्यावर पारनेरला भंगी काम, साक्षरता इत्यादि सेवा करीत. वडिल गणपतीचे पुजारी. लोकांनीं त्यांच्याकडे तक्रारी केल्या. तेव्हां वडलांना म्हणाले, “ तुम्ही गणपतीची पूजा करतांना त्याची बैठक साफ करता. मी माझ्या गणपतीची साफ करतों. माझा गणपति जगभर पसरला आहे.”
सेनापतींचा महान् निरंहकारी त्याग, ही अखंड सेवा का फुकट जाईल ?

 

पुढे जाण्यासाठी .......

हिमालयाची शिखरे