रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

हिमालयाची शिखरे

राष्ट्रपुरुषा, तुझ्या जीवनांत सर्वांना स्थान होतें. मुसलमानांच्या हातीं राज्य दिलेंत तरी चालेल; परंतु तुम्ही जा असें तुम्ही तीव्रतेनें म्हणायचे. आज देशाची दुर्दैवानें फाळणी झाली आहे. उपाय नव्हता. ते मुस्लीम-बहुसंख्य भाग आज ना उद्या अलग झालेच असते. कोटयवधि लोकांना केवळ दडपून ठेवता येणार नाहीं. तरी उरलेला ३० कोटींचा भाग कांही लहान नाहीं. येथें आम्ही सारे एकत्र नांदू, एक म्हणून वागूं, तर तुमच्या आत्म्याला किती आनंद होईल ! भारताचा एवढा मोठा भाग लोकसत्तेखालीं कधीं होता ? असें जनतेचें लोकशाही स्वराज्य कधीं होते ?

तुम्ही या स्वराज्याला; उर्वरित महान् भारताला आशीर्वाद द्याल. तुम्ही व्यवहारहि जाणणारे होता. जगाच्या इतिहासाचा धडा हाच कीं आपण जसें इच्छितो, तसेंच सारे होत नसतें, मिळत नसतें. अनेक शक्तीचे अन्योन्य आघात प्रत्याघात होत असतात. क्रिया प्रतिक्रिया होत असतात.

तुम्ही म्हणाला, “ सहा हजार मैलांवरचे तर गेले. पिळवणूक तर थांबली. ३० कोटि तरी आपल्या भाग्याचे विधाते झाले. ठीक. आता लागा कामाला. क्षुद्र भेद, भांडणें नकोत. झालें गेलें विसरुन येथें नवसृष्टि निर्मायला उचला कुदळ फावडे.”  होय, असेंच तुम्ही म्हणाला असता.

स्थितप्रज्ञा ! तुला संकटांची पर्वा नसे, कशाची भीति नसे. मुंबईस तुरुंगात मित्र रात्रीं भेटायला आले तर तू घोरत होतास. उद्यां किती शिक्षा होईल याची मित्रांना चिंता परंतु तूं निश्चिंत होतास ! सुरतेला खुर्च्या, जोडे यांच्या वर्षावांत तूं धीरोदात्तपणें उभा होतास. तुझ्या डोळयांत सूर्याचें तेज, मुखावर सिंहाची सामर्थ्यशाली गंभीरता ! परंतु स्वराज्य मिळाल्यावर तुम्ही काय केले असते ?

समर्थ म्हणाले, ‘ आनंदवनभूवनीं स्वराज्य आलें, ’ ‘ उदंड जाहलें पाणी स्नान संध्या करावया, ’ ‘ आतां मला माझें भजन पूजन करुं दे.’

तुम्ही म्हणाला असतात, “ आता मला गणितशास्त्रावर ग्रंथ लिहूं दे. वेदांचा अभ्यास करु दे.”

ज्ञानोपासनेसारखा निर्मळ आनंद नाही. त्या आनंदांत का तूं रमला असतास ? अमेरिकेला स्वतंत्र करुन जॉर्ज वॉशिग्टन शेतावर निघून गेला. परंतु जनतेनें त्याला बोलावून आणले नि म्हटलें तुम्हीच पहिले अध्यक्ष व्हा. तुम्ही सेवेंत पहिले, जनतेच्या हृदयांत पहिले.” तसें भारतीय जनता तुम्हाला म्हणाली असती का ?

“ मरायला तयार एक हजार तरुण द्या. मी बंड पुकारतो,” “ स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, तो मी मिळवणारच, ”ü “ या न्यायसनाहून थोर असें एक ईश्वरी न्यायासन आहे. कीं तेथें मी निर्दोषच ठरेन. माझ्या हालअपेष्टांनी माझे कार्य वाढावें अशी ईश्वरी इच्छा असेल ”- अशी एक का दोन शेकडो वचने आढळतात तुमची. तुमच्या भव्य, दिव्य स्मृतिला शतश: प्रणाम, लोकमान्य प्रणाम !

 

पुढे जाण्यासाठी .......

हिमालयाची शिखरे