शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

पत्री

।।दोन।।

श्री. साने यांनी आपला ‘पत्री’ नामक काव्यसंग्रह मजकडे पाठविला आणि त्यावर अभिप्रायवजा थोडेसे लिहावयास सांगितले. पत्रीतील सुमारे एकशे साठ स्फुट कविता आणि ‘सत्याग्रही’ या खंडकाव्याचा अपुरा भाग मी बारकाईने वाचला. त्यावरुन मला जे काय वाटले तेच या ठिकाणी लिहीत आहे.

पत्रीतील आरंभीच्या सुमारे ८५ कवितांत कवीने आपणाकडे साधकाची भूमिका घेऊन आपल्या सुखदु:खाची, आशानिराशेची व कल्पनाध्येयाची करुणकहाणी. प्रभूचरणी निवेदन केली आहे. उदात्त आणि प्रसन्न विचार, निर्मळ आणि हळूवार भावना आणि पवित्र वातावरण ह्यामुळे बहुतेक प्रार्थना आनंददायक झाल्या आहेत. वाणी आणि मन ह्यांना पावित्र्य मिळावे व आत्मशुद्धी व्हावी, हा हेतू कित्येक प्रार्थनांच्या मुळाशी दिसतो. ‘वसंतवारा’, ‘हृदयाचे बोल’ व ‘देवाजवळ’ ही आत्मनिवेदनात्मक स्तोत्रे मधूर आहेत. ‘नयनी मुळी नीरच नाही’, ‘सोन्याचा दिवस’, ‘देवा झुरतो तव हा दास’, ‘हे नाथ येईन तव नित्य कामी’, ‘काही कळेना काही वळेना’ व ‘भाग्याचे अश्रू’ या भावगीतांतून कल्पनानाविन्य व आर्तता उत्कटतेने व्यक्त झाली आहेत.

ह्या सर्व प्रार्थनांचा एकत्रित विचार केल्यास असे दिसते की, ह्या प्रार्थना जरी निरनिराळ्या गेय वृत्तांत लिहिल्या आहेत तरी त्या सर्वांत प्रकट झालेली वृत्ती एकच म्हणजे करुणोत्कट आहे. सूक्ष्म रीतीने पाहिल्यास ध्येयाच्या आभासापासून तो ध्येयसिद्धीपर्यंतची कवींच्या मानसिक स्थित्यंतराची आंदोलने येथे दिसतात. तसेच संकटे आणि निराशा ह्यांतून मार्ग काढीत कवीचे मन आशा आणि आनंद ह्यात असे स्थिर झाले आहे, ह्याचाही प्रत्यय येतो.

स्वतंत्र विषयावरील स्फुट काव्यांपैकी ‘ग्रंथमहिमा’ ह्या कवितेमधील व्यापक दृष्टिकोण, ‘शांती कोण आणील’ यातील नवसंदेश, ‘प्रेमाचे गाणे’ यातील अश्वासन आणि ‘हस रे माझ्या मुला’ यातील सूचक प्रेमभाव अपापल्यापरी हृदयहारी व अभिनव वाटतात.

पत्रीतील दुस-या विभागात स्वदेशभक्तीपर स्फुट कवने आली आहेत. आधी केले आणि मग सांगितले हा रामदासांचा दंडक त्यांच्या कवनांस लागू पडतो म्हणूनच त्यांची राष्ट्रीय कवने वैशिष्टयपूर्ण उतरली आहेत. दे. भ. सावकर, से. बापट किंवा गोविंद शाहीर ह्यांनी लिहिलेल्या कवनांत जो आवेश व जी स्फूर्ती दृष्टीस पडते तिचे प्रत्यंतर श्री. साने यांच्या ‘जारे पुढे व्हा रे पुढे’, ‘नवयुवक’, ‘तुफान झालो’ इत्यादी कवनांतून आपणास मिळतो. ‘बलसागर भारत होवो’, ‘भारतास’ व ‘स्वातंत्र्याचे गाणे’ ही गीतत्रयी प्रत्येक हिंदवासियाने मुखोदगत करावी एवढा तीत जिवंतपणा आहे. उत्कट राष्ट्रप्रेम, दुर्दम आशावाद आणि अंत:करणाची खरी तळमळ ह्यांमुळे श्री. साने ह्यांची राष्ट्रीय गीते स्फूर्तिदायक व मनोवेधक झाली आहेत, यात शंका नाही.

‘सत्याग्रही’ हे खंडकाव्य मला अपुरेच वाचावयास मिळाले पण हि-याची उज्वलता त्याच्या एका पैलूवरुनही दिसते, तसेच ह्या काव्याबद्दल म्हणता येईल. या खंडकाव्यास कथानक फारसे नाहीच तरी पण सतीचे वाण धारण करणा-या सत्याग्रही वीराने आपल्या देशाच्या सद्यस्थितीविषयी जे सडेतोड व भावनोत्कट विचार प्रगट केले आहेत, ते प्रत्येकास आत्मसंशोधन करावयास लावतील इतके प्रभावी आहेत.

श्री. साने हे ध्येयवादी आहेत. स्वार्थत्याग व निरपेक्ष सेवा हे त्यांचे व्रत होय. ‘विचार भावना कृती, तरीच होई उन्नती’ हे त्यांच्या जीवनाप्रमाणे त्यांच्या काव्याचेही रहस्य दिसते.

निर्मळ भावनेचे व ओघवती पण मधुर भाषासरणीचे ‘जीवन’ मिळाल्यामुळे त्यांची ‘पत्री’ टवटवीत दिसते हे खरे तरी पण प्रत्यक्ष कृतीवर अधिष्ठित झालेल्या त्यांच्या जीवनाच्या सूर्यकिरणांत तिची शोभा अधिक वृद्धगत झाली आहे, यात शंका नाही! थोडक्यात म्हणजे अगोदर स्वत:च ते काव्याचे विषय झाले आहेत आणि मगच त्यांनी ही काव्यपत्री शारदेच्या पायी अर्पण केली आहे. तिचे स्वागत मराठी रसिक मोठ्या आनंदाने व आदराने करतील, अशी मला पूर्ण खात्री वाटते.

दि. ६-४-१९६५                             
-वामन भार्गव पाठक

 

पुढे जाण्यासाठी .......

पत्री