बुधवार, जुन 03, 2020
   
Text Size

पत्री

।।तीन।।

रा. साने यांचा ‘पत्री’ हा काव्यसंग्रह वाचीत असता त्यांच्या प्रत्यक्ष परिचयाच्या वाचकांसमोर खुद्द सान्यांची मूर्तीच उभी राहते. इतकी त्यांची कविता हुबेहुब त्यांच्यासारखी आहे. हे साम्य दोघांच्या अंतरंगात व बाह्यांगातही समप्रमाणात दिसून येते. सान्यांच्या हृदयाप्रमाणे त्यांची कविता प्रेमळ, मोकळी, निर्मळ, जरा हळवी पण निश्चित ध्येयासाठी ‘हाल होवोत तो चित्त ना मुळी भिते’ असे ठासून सांगण्याइतपत कणखर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या साध्या व विनीत बाह्यांगाला साजेल असेच त्यांच्या कवितेचेही बाह्यांग आहे. तिच्यात नवीन जाती-वृत्तदिकांचा डामडौल नाही, कलेचा बडेजाव नाही, पिशाप्रेमाचे नाचरंग नाहीत व कवित्वाचा अहंभाव तर नाहीच नाही. पण खुद्द साने व त्यांची कविता या दोघांनाही ‘वेष असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा’ या समर्थांच्या बोलाची पक्की खुणगाठ बांधून ठेवलेली दिसते.

आपल्या परमेश्वरपर काव्यात सान्यांनी ईश्वराला हृदय पिळवटून आर्तरवाने आळविले आहे. सागरातील आपल्या होडीला वल्हविण्यास थोडी मदत मागितली आहे. अंधारात एकाददुसरा किरण याचिला आहे, पण या याचनेत शिरजोर भिका-याचा हट्ट नाही, आतताईपणा नाही की आक्रोश नाही. येथून तेथून विनयाचे बोलणे व लीनतेचे चालणे. रा. साने यांनी अश्रुंचे एक नवीन तत्त्वज्ञान या कवितेत मांडले आहे. वाचकांस त्यांच्या कवतित कवितेत निराशेचे सुस्कारे व सर्वत्र अश्रूचे पूर दिसून येतील. याचे कारण त्यांचे चित्त फार हळुवार व भावनावश आहे. पण असे भावनाप्रेरित अश्रू येणे, देशबांधवांची व धर्मबांधवांची दु:खे बघून व सुखेही देखून गहिवरुन जाण्याइतपत हृदय जिवंत असणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. म्हणून ते म्हणतात, ‘अश्रू माझी आशा, अश्रू माझे बळ.’

‘माझे ध्येय’ या एका कवितेत सान्यांचे समग्र जीवनसर्वस्व ओतलेले दिसते. श्रम हा त्यांचा देव आहे व श्रम हे त्यांचे पूजासाहित्य आहे. शहरींच्या तकलुबी व दिखाऊ जीवनाला कंटाळून ते खेडोपाडीच्या राहणीने गरीब पण मनाने श्रीमंत असलेल्या आपल्या शेकडो देशबांधवांशी समरस झालेले आहेत. जानपदवाङमयाचा एक नमुना म्हणून यातील बरीच काव्ये दाखविता येतील. त्यात खेड्यांच्या सुखदु:खाला कळवळ्याची वाचा फोडली आहे.

सदर कवितेला तिच्या साधेपणामुळे, तळमळीमुळे व कवीच्या खडतर तपस्येमुळे एक रमणीय वैशिष्ट्य आले आहे. रा. साने यांनी असले ‘देशीकार लेणे’ मराठीवर चढविले, याबद्दल कोणासही आनंदच होईल.

दि. १०-४-१९३५                                    -के. ना. वाटवे

।।चार।।

रा. पा. स. साने यांनी वेळोवेळी रचिलेल्या कवनांचा संग्रह ‘पत्री’ नाव या संग्रहास दिले आहे, ते त्यांच्या वृत्तीशी फार जुळते आहे. ज्या दयामय देववर भरवसा ठेवून आणि ज्याच्यापुढे आपला ‘इवलासा अश्रू’ टपाटपा गाळून आपले हृदय हलके करण्याचा व्यवसाय साने अंतर्मुख होऊन चालवितात. त्यालाच ही ‘पत्री’ त्यांनी वाहिली आहे! ‘पत्रं पुष्पं फलं तोयम्’ या वर्गातील ही पत्री आहे. हिच्यातच साने यांचे प्रसन्न, स्वत: हसून दुस-यास हसविणारे ‘निर्मळ हृदय’पुष्प सापडेल. यातच ‘बांधील कारखाने शाळा उभरवील’, ‘संन्यास हा नवीन राष्ट्रास वाचवील’ अशा प्रकारच्या नवीन संन्यासाचे मधूर फलही दिसून येईल. आणि अशी ही पवित्र पत्री साने यांनी ज्या ‘अश्रूंच्या बिंदूत’ माझा ‘सुखसिंधू’ मानिला आहे, त्या सिंधूच्या तोयात श्रद्धेने भिजविली आहे. या अश्रूचे ‘माणिकमोती’ या पत्रीत सर्वत्र विखुरलेले दिसतात आणि त्यांचे ‘पाणी’ कोणालाही क्षणभऱ तरी भारुन टाकल्याशिवाय राहणार नाही.

काव्याचा आत्मा रस हा मानला आहे. त्या दृष्टीने पाहिले तर साने यांच्या पत्रीत अंगचा रस आहे. व्यापत अर्थाने भक्तिरस पत्रीत भरपूर आहे. दीनांच्या विषयी अपरंपार तळमळ जागजागी दिसते. तिला शाब्दिक रुप देताना विविधता व सौंदर्य ही जर आजच्यापेक्षाही अधिक पत्रीत असती तर पत्री फारच मोहक वाटली असती. जास्त तजेला पत्रीतील अश्रू, का मजला देता प्रेम, इत्यादी दहा-वीस कवनात चमकताना स्पष्ट दिसतो. ‘लहानपणची आठवण’ वत्सलरसाने डवरलेली आहे. दास कवीच्या मनाची घडण मूळची कशी आहे, ते यात उत्तम प्रकारे प्रतिबिंबीत झाले आहे. ‘जा रे पुढे व्हा के पुढे’ हे कवन स्फूर्तीदायक उतरले आहे आणि ‘स्वातंत्र्यानंदाचा जयजयकार’ मनामध्ये हर्षानंदाच्या ऊर्मी उचंबळविल्याशिवाय राहत नाही.

तळमळ, सदभावना, उच्च ध्येय, दीनसेवा, अर्पित जीवन यांचे प्रेरक सूर पत्रीतील कवनाकवनात भरलेले आढळतात. खरे आहे की तेच तेच सूर सर्वत्र भरलेले, कधी तेच तेच शब्द पुन:पुन्हा कानी पडलेले पाहून या एकतानतेमुळे कंटाळवाणेपणा वाटतो. चंचल मनाच्या भ्रामरी वृत्तीला हे रुचणार नाही. तथापि संयमी मनाला या पत्रीपासून नि:संशय सत्त्वभाव दाटून येतील. बापटांच्या चैतन्य गाथ्यानंतर त्याच जातीची ही पत्री मराठी वाङमयात आपल्या तेजाने तळपेल.

-दत्तो वामन पोतदार

 

पुढे जाण्यासाठी .......

पत्री