शनिवार, सप्टेंबर 26, 2020
   
Text Size

पत्री

।।पाच।।

रा. रा. पां. सदाशिव साने यांचा पत्री नामक कवितासंग्रह समग्र वाचला. पत्रीची एकंदर ‘पर्ण’ (पृष्ठ) संख्या सुमारे ३८० असून त्यांपैकी ३०० पृष्ठांत गीतकवजा स्फूटप्राय अशा १६१ कविता असून बाकीच्या पृष्ठांत त्यांच्या ‘सत्याग्रही’ या अजून अप्रकाशित अशा खंडकाव्यातील जो भाग आज प्रसिद्ध करण्यासारखा आहे, तो दिला आहे. संग्रहित केलेल्या कवितांचे लहानमोठे आकार आणि विषयांची विविधता यांच्या दृष्टीने संग्रहाचा सरसकटपणा ‘पत्री’ या अन्वर्थक नामात सूचित झाला असून कवीच्या कवित्वशक्तीचे अभिनव कौमार्य आणि भक्त्युत्कट ईश्वरसमर्पणबुद्धी यांचाही रम्य ध्वनी त्यांत प्रतीत होण्यासारखा आहे, असे मला वाटते.

संग्रहातील ब-याचशा कवितांचा जन्म निरनिराळ्या ठिकाणच्या कारागृहवासाच्या अवधीत झाला आहे, ही गोष्ट यांच्या शेवटी दिलेल्या स्थाननिर्देशावरुन प्रामुख्याने प्रतीत होतेव तिच्या द्वारे ‘विपत्ती दे तीही हवी विकासा’ या कवितेतील कवीच्या उदगारास एक प्रकारचे विशेष करुणरसपूर्ण यथार्थत्व न स्वारस्य प्राप्त झाले आहे. म्हणून प्रस्तुत संग्रह केवळ फुरसतीचा बुद्धिविलास नसून, बाह्य कष्टप्रद परिस्थितीमुळे अधिकच उत्कट चिंतनात्मक होणा-या अशा भक्तिपूर्ण, सात्विक, सुसंस्कृत व कर्तव्यनिष्ठ अंत:करणात अखंड उचंबळणा-या आणि स्वयंस्फूर्तीने व प्रबळ वेगाने काव्यरुप पावलेल्या अंतर्वृत्तीच्या उदगारजलाने निर्माण झालेले हे रम्य व सत्विक आल्हाददायक असे ‘अच्छोद सरोवर’च आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळेच त्यातील कित्येक कवितांचा सकृद्दर्शनी भासणारा प्रमाणरहित दीर्घविस्तार कंवळ काव्यरचनेच्या दृष्टीने कित्येकास अयुक्त वाटण्याचा संभव असला तरी ‘पूरोत्पीडतडागस्य। परिवाह: प्रतिक्रिया’ (जळ तुंबता तडागी फोडावा लागतो जसा पाट) या न्यायने त्या त्या वेळच्या उत्कट वृत्तींना पुरी वाट करून देण्याच्या दृष्टीने हा विस्तार स्वाभाविक व समर्थनीय वाटेल यात शंका नाही.

सारांश, मन:पूर्वकता (Sincerity)  हा जो कोणत्याही ख-या काव्याचा खरा निदर्शक असा मुख्य गुण तो पत्रीत सर्वत्र विपुलपणे निदर्शनास येतो. पत्रीतील कवितांचे मुख्य विषय ईश्वरनिष्ठा, ईश्वरप्रार्थना, स्वत:ची हीन व अगतिक स्थिती, स्वत:च्या जीवनकार्याचे चिंतन, राष्ट्राची सद्य:स्थिती, प्रिय भारतभूमीचा उद्धार व तिची स्वातंत्र्यप्राप्ती हे आहेत. या सर्वांसंबंधीही कवीच्या मनाची उत्कट तळमळ, भक्तिप्रवणता आणि सुसंस्कृत उदबोधक विचारसरणी हे गुण चांगले प्रतीत होतात आणि काव्यरचनाही त्या त्या वृत्तीस साजेशी विनम्र व उदात्त, सात्विक, आवेशपूर्ण, आशा व उत्साहप्रेरक आणि प्रसंगोपात्त अत्यंत हृदयस्पर्शी करुणरसोत्कट व मार्दवयुक्त अशी आहे.

पत्रीतील भक्तिविषयक कवितांसंबंधी जी एक गोष्ट प्रमुखपणे ध्यानात येते ती ही की त्यातील आत्माविष्कार व आत्मार्पण यांचे स्वरूप आपल्यातील श्री तुकाराम-नामदेवादिकांच्या उदगारांत येणा-या ‘सख्यमात्मनिवेदना’पेक्षा सध्याच्या कविवर्य रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, थिऑसॉफिस्ट वगैरेंच्या उदगारात दिसून येणा-या आत्मार्पणाच्या व सेवाशरणतेच्या कल्पनांशी त्यांचे जास्त सादृश्य आहे आणि सध्याच्या परिस्थितीच्या संस्काराचे प्रतिबिंब या दृष्टीने ते अगदी स्वाभाविक आहे.

स्वातंत्र, राष्ट्राची सद्य:स्थिती व मातृभूमीच्या उद्धाराविषयीची तळमळ या संबंधाच्या कविता अलीकडच्या कित्येक पोषाखी व स्वसुखलोलूप कवींच्या कवितांप्रमाणे वरपांगी कळकळीच्या नाहीत किंवा ठरीव साच्याच्या, खोडसाळ व अतिशयोक्तीपूर्ण नाहीत, तर ज्याचा वरील गोष्टींशी जीवनकार्याद्वारा प्रत्यक्ष जिव्हाळ्याचा संबंध निगडित झालेला आहे आणि तत्प्रीत्यर्थ ज्या व्यक्तीने स्वत: देहकष्टादिद्वारा खस्ता खाऊन, आश्रमादी जनताशिक्षणकार्याला स्वत:ला वाहून घेऊन आत्मार्पण करण्याचा सक्रीय उपक्रम चालविला आहे, अशा कवीच्या या राष्ट्रीय कविता असल्यामुळे खरे औचित्य व स्वारस्य त्यात आहे आणि म्हणूनच पत्रीतील अनेक राष्ट्रीय कवितांतून सात्विक राष्ट्रकार्ययोगाची स्फूर्ती देणारी तेजस्वी विचारसरणी व उदात्त ध्येयात्मक रम्य कल्पना व आशाचित्रे भरपूर सापडतात, यात नवल नाही.

अभिप्रायारंभीच दर्शविल्याप्रमाणे पत्रीतील कवितांची विविधता व विपुलता फार असल्यामुळे कवीच्या निरनिराळ्या गुणांच्या निदर्शक अशा निवडक कवितांचा अवतरणे देऊन थोडक्यात निर्देश करित येणे शक्य नाही. हे जरी खरे असले तरी मासल्याकरिता कवीचे जीवनध्येय व त्याची ईश्वरसमर्पणात्मक बुद्धी यांची द्योतक अशी दोनच अवतरणे खाली देऊन बाकीच्या लक्षणीय कवितांचा फक्त क्रमांकासहित नामनिर्देश करतो.

अश्रु पुसावे
जन हासवावे
याहून नाही दुजे काही ना मी
हे कवीचे जीवनध्येय आहे.
तुझ्या करांतील बनून पावा
कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा
यात ईश्वरार्पणबुद्धी गोड रीतीने दर्शविली आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......

पत्री