बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

पत्री

देशभक्ताची विनवणी!

सन्मित्रांनो! सुबांधवांनो! परिसावी मदगिरा
यथार्था परिसवी मदगिरा
गारगोटीच्या परी न व्हावे, व्हावे सुंदर हिरा
धवळावे निज-यश:सुरंगे विश्व सकल सुंदर
उठा रे, विश्व सकल सुंदर
मुकुंद पूजुन निजान्तरंगी करा यत्न दुर्धर
यत्नास यश प्रभु देई
श्रद्धेस यश प्रभु देई
आशेस फळ प्रभु देई
कर्तव्याचे कंकण बांधुन करी, न उदरंभर
बनावे, केवळ उदरंभर
महायशाते बलविभवाते संपादा सत्वर।।

ज्ञान नको, बळ नको, नको ते शील, नको ते धन
आम्हाला नको नको ते धन
निरस्तविक्रम होउन दुर्बल ऐसे म्हणती जन
खरे न हे वैराग्य, बंधुंनो! खरे तपस्वी बना
तुम्ही रे खरे तपस्वी बना
देण्यासाठी मिळवा ज्ञाना मिळवा दौलत धना
भाग्यास जगी मिरवावे
वैभवी राष्ट्र चढवावे
कीर्तिने विश्व वेधावे
स्वाभिमानधन अनंत सतत संचवून अंतरी
सख्यांनो, संचवून अंतरी
स्वर्गसुखाते संपादावे राहोनी भूवरी।।

मेंढ्यापरि ना पडा बापुडे, मरण त्याहुनी बरे
खरोखर मरण त्याहुनी बरे
मेल्यापरि हे जीवन कंठुन कोण जगी या तरे
लोखंडाची कांब त्यापरी देह करा कणखर
अगोदर देह करा कणखर
देहाहुन निज मग उत्साही करा धीरगंभिर
आकाश कोसळो वरी
पदतळी भूमि हो दुरी
मज फिकीर नाही परी
ध्येयोन्मुख मी सदैव जाइन पतंग दीपावरी
जसा तो पतंग दीपावरी
ऐसा निश्चय करा, भस्म हो, जाउ न मागे परि।।

स्वातंत्र्याच्या स्वर्गामध्ये जीवात्मा रंगवा
बंधुंनो! जीवात्मा रंगवा
पारतंत्र्यशृंखला कडाकड बलतेजे भंगवा
निजांतरंगी अखंड अशादीप पाजळोनिया
गडे हो दीप पाजळोनिया
नैराश्याची निशा नाशकर सत्वर न्यावी लया
तर उठा झडकरी अता
लावा न मुळि विलंबता
द्या धीर दुर्बला हता
विजयाचा जयनाद घोषवा दुमदुमोन अंबर
जाऊ दे दुमदुमोन अंबर
स्वर्गी गातिल युष्मन्महिमा मग नारद-तुंबर।।

-अमळनेर छात्रालय, १९२७

मातृभूमिगान

हे शुभकीर्ते जगद्विश्रुते भारतमाते विमलतरे
मंगलमूर्ते मानसपूर्ते त्वन्नमने जन सकल तरे।।
अतिकमनीये शुभ रमणीये नमनीये स्तवनीयवरे
विद्यानंदे वैभवकंदे वंदेऽहं त्वां प्रेम-भरे।।
जगदभूषणे मनस्तोषणे विपच्छोषणे मधुरतरे
सकलपावने अघविनाशने कलिमलदहने पुण्यपरे।।
तत्त्वपंडिते सुमुनिमंडिते वाङमयसरिते विजयवरे
शुभगिरिभूषित सुसरित्-पूरित सुवनालंकृत अतिरुचिरे।।
सदय-मानसे वात्सल्यरसे प्रसादपूर्णे दैन्यहरे
अजरे विश्वंभरे देवते कविस्तुते परमार्थपरे।।
अन्नदायिनी ज्ञानदायिनी जगन्मोहीनी प्रभुप्रिये
तपोभूमि तू, कर्मभूमि तू, निस्तुल निरुपम निरंतरे।।
त्वदगुणगायन, त्वत्पदवंदन, त्वत्सेवन, मत्कर्म खरे
त्वत्सुत हे मदभूषण माते! परमोदारे स्नेहसरे।। हे शुभ...।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, सप्टेंबर १९३०

 

मारी माते कुणि जरि न ती मन्मनोमातृमूर्ती
कंठा कापी कुणि जननिचि ती न कंठस्थकीर्ती
हालांची ना लवहि उरली आज आम्हां गुमान
आता गेलो खवळून खरे आम्हि झालो तुफान।।

केला विरोध जरि या सगळ्या जगाने
ना गांगरुन मुळि जाउ आता भयाने
मोक्षार्थ जे ज्वलित राष्ट्र उभे असेल
त्याच्यापुढे न जगती कुणिही टिकेल।।

या भारतास हसवू करुनि स्वतंत्र
ते देशभक्तिमय या म्हणु दिव्यमंत्र
सर्वस्व-होम करणे सगळे उठा रे
वारे पहा प्रबळ, हे झडती नगारे।।

ही वेळ बंधु न असे तुमच्या निजेची
ही वेळ बंधु न विलास-विनोदनाची
स्वातंत्र्य वेळ शुभ दिव्य अपूर्व आली
आता उठा सकळही झणि याच काळी।।

आली घडी पुनरपि परतोन ये ना
जो जातसे क्षण कधी फिरुनी मिळेना
ना आळशी तुम्हि बना न बना उदास
या आइचे सकळही झणि तोडु पाश।।

उत्साहसागर बना दृढ धैर्यमूर्ती
स्फूर्ति प्रचंड उसळो मिळवा सुकीर्ती
होईल माय अपुली शतबंधमुक्त
तेजे उठाल सगळे जरि रे सुपुत्र।।

हे राष्ट्रतेज सगळे भडके उफाळे
हे देशभक्तिस पाहा शतपूर आले
हे ठेउनी निज सुखावरती निखारे
दास्या पदी तुडविण्या सुत सिद्ध सारे।।

झालो तुफान सगळे न अता गुमान
झालो तुफान सगळे नच देहभान
झालो तुफान करु हासत देहदान
स्वातंत्र्य आणु अथवा मरु हीच आण।।

-त्रिचनापल्ली तुरुंग, फेब्रुवारी १९३१

प्रिय भारता सुंदरा!


प्रिय भारता सुंदरा!।।
ज्ञानविहारा! परम उदारा!
कुदशा जाइल तव कधि दूरा?।। भारता....।।

सत्त्व कुठे तव? त्याग कुठे तव?
तोडी कवण तव सुयशो-हारा?।। भारता....।।

पुत्र न दिसती, वैरी गमती
जे तुज लोटिति दुर्गति-दारा।। भारता....।।

शोक न करि तू प्रभुला प्रिय तू
अवतरुन तुला तारिल, मधुरा!।। भारता....।।

-अमळनेर, ऑगस्ट १९३१

दुबळी मम भारतमाता!

दुबळी मम भारतमाता
दीन विकल दिसते अनाथा।। दुबळी....।।

कोट्यावधि हे पुत्र असोनी, येति न कोणी ते धावोनी
आज तिला कुणि देइ न हाता।। दुबळी....।।

ये करुणाकर, ये मुरलीधर, भारतभूमी तुज ही प्रियकर
ये नतनाथ! खरोखर आता।। दुबळी....।।

-अमळनेर, ऑगस्ट १९३१

 

तेव्हा घडे उन्नती!

उत्साही मुखमंडले भुजगसे दोर्दंड दिव्याकृती
नानापत्ति पथी जरी दिसती ना लोपे यदीया धृती
मोठे कार्य करावयास बघते दिव्या सदा यन्मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

स्नेहाने भरले परस्पर सदा विश्वास जे दाविती
सर्वांची सहकार थोर करण्यासाठी असे संमती
ऐक्याचे कळुनी महत्त्व न कधी जे मत्सरे भांडती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

ज्यांच्या निर्भय अंतरी सतत जो सत्स्वाभिमान स्फुरे
ज्यांच्या दृष्टिसमोर जाच जुलमी दुष्ट जनांचा नुरे
भीती एक जगत्पतीस, न दुजा कोणाहि, जे सुव्रती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

तेजाला कवटाळिती परि सदा जे शिस्त सांभाळिती
अन्याला सुखवावया स्वसुखही नि:शंक जे होमिती
चित्ती उज्वल भावना परि विचाराला न जे सोडिती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती तेव्हा घडे उन्नती।।

देशाची अतुला निरंतर वसे भक्ती यदीयांतरी
देशाचे हित ज्यात तीच करिती कार्ये सदा जे करी
भूमातेस्तव जे सदा झिजविती वाणी, वपु, श्री, मती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

देशासाठि सचिंत अन्य कसली चिंता न ज्यांना असे
देशासाठि फकीर नित्य हृदयी ती मातृमूर्ती वसे
सेवा नित्य रुचे, सुचे न दुसरे सेवेत जे रंगती
ऐसे पुत्र यदा इथे निपजती, तेव्हा घडे उन्नती।।

जेव्हा ऐक्य सहानुभूती उदया येतील आम्हांमध्ये
त्यागी उद्यममग्न होतिल यदा, बंधुत्व चित्ति जडे
जेव्हा स्वार्थ असेल दूर, हृदया वाटेल सत्यीं रती
जेव्हा निर्भयता दिसेल नयनी, तेव्हाच राष्ट्रोन्नती।।

-अमळनेर, १९२६

तुफान झालो!

नाही आता क्षणहि जगणे भारती या गुलाम
मारु सारे भय हृदयिचे निर्मू स्वातंत्र्यधाम
नाही एक क्षणहि खपते दास्य विश्वंभराला
स्वातंत्र्याला मिळउन चला जाउन तत्पूजनाला।।

जो या आहे क्षणिक शरिरी अंतिम श्वास एक
भूमातेला सुखविन सुखे होउ मद्रक्तसेक
माता आता क्षणभरिहि ना बंधनी ह्या बसू दे
जावो माझी तनु परि मम म्लान माता हसू दे।।

कैसे साहू? सतत जरि ते आइला नागवीती
कैसे पाहू? सतत जरि ते बंधुंना गांजिताती
बैसावे का विलपत? न का पौरुषाचा स्फुल्लिंग
न श्वानाचे वरु हत जीण, होउ या धीरधिंग।।

झालो का हो सकळ इतुके श्वान पस्तीस कोटी
कैसे दास्यी सतत पिचतो नाहि का त्वेष पोटी
आहो का हो हृदयि बघणे मेष मानूष वा ते
सारे तुम्हां जग भरडिते धान्य ते जेवि जाते।।

आता ओठी मधुरतम त्या गाउ या मातगीता
आता सारे उठुन करु या बंधमुक्त स्वमाता
ना लावावे क्षणहि पळहि भारते मुक्त व्हावे
लोकी आता वर करुनिया मस्तकाते जगावे।।

या रे सारे मिळून करु या आधि ऐक्यावलंब
स्पृश्यास्पृश्ये सकळ उडवू जाळु हे भेददंभ
हालक्लेशा मुळिहि न भिणे स्वीय स्वातंत्र्य घेणे
तेजे पेटू अनलसम ही वैभवी माय नेणे।।

या देहाचे करिल तुकडे राईराईसमान
कोणी क्रोधे तरि सतत मी उंच राखीन मान
ओठी माझ्या प्रियजननिचे दिव्य नाचेल गान
माझ्या मातेस्तव करित हो मी मुदे देहदान।।

   

दिव्य मी स्वर्ग निर्मीन

ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन।। दिव्य....।।

मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन।। दिव्य....।।

गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन।। दिव्य....।।

स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन।। दिव्य....।।

भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन।। दिव्य....।।

करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन।। दिव्य....।।

आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन।। दिव्य....।।

कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन।। दिव्य....।।

रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन।। दिव्य....।।

मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन।। दिव्य....।।

-धुळे तुरुंग, मे १९३२

देशासाठी मरु!

देश आमुचा वैभवशाली वाली सकलहि जगताचा
तद्ध्यानामधि रंगुन जाऊ गाऊ त्याला निज वाचा
पराक्रमाने निजमातेला मिरवू सा-या जगतात
कीर्तिध्वज विश्वात उभारु निजतेजाने दुर्दांत

वीरापरि तरि उठा झणी
दिगंत जिंकू चला क्षणी
निजमातेला स्मरुनि मनी
मुकुंदपादांबुज वंदुनिया प्राणांवर हाणू लाथ
कोण करी जगी विरोध आता करु सर्वांचा नि:पात।।

धन्य मावळे पावन झाले देशासाठी निज-मरणे
जगणे भूषण आम्हां कायसे भीति कशाला मनि धरणे
दों दिवसांची तनु तर साची वाचवुनी तरि काय मिळे
देशासाठी उदार होऊ मृत्यु कुणाला जगी टळे

हसू यमाचा फास जरी
हसू जगाचा जाच जरी
हसू सदोदित निजांतरी
धैर्य हासत तेजे तळपत निजमातेचा सन्महिमा
त्रिभुवनि अवघ्या पसरु दावू मातेचा वैभवगरिमा।।

-अमळनेर, १९२७

 

माझा महाराष्ट्र भाग्ये सजो

माझ्या महाराष्ट्रभूमीत मोठे
प्रतापी पुन्हा वीर निर्मी विभो
शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश, शिल्पी,
कलाविद् खरे थोर निर्मी प्रभो
श्री, नीति, संपत्ति, सदबुद्धि, सहकार्य
आरोग्य, ऐक्यादि येथे रुजो
धावो यशोगंध देवा! दिगंतात
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो।।

-अमळनेर, १९२९

भारतमाता माझी लावण्याची खाण!

(नाचून म्हणावयाचे गाणे)

भारतमाता माझी लावण्याची खाण
गाइन तिचे गान, मी गाइन तिचे गान
करिन तिचे ध्यान, मी करिन तिचे ध्यान
भारतमाता माझी लावण्याची खाण
प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण, माझ्या प्राणांचीही प्राण
भारतमाता माझी लावण्याची खाण।।

मांडिन निर्भय ठाण, मी मांडिन निर्भय ठाण
देइन माझे प्राण, मी देइन माझे प्राण
हातात घेतले आहे सतिचे मी वाण।। गाइन...।।

जाळिन सारी घाण, मी जाळिन सारी घाण
काटिन रुढिरान, मी छाटिन रुढिरान
हसवीन आइचे जे मुख झाले म्लान।। गाइन...।।

उडविन दाणादाण, मी उडविन दाणादाण
करिन धूळधाण, मी करिन धूळधाण
स्वातंत्र्य-विरोधकां देतो मी आव्हान।। गाइन...।।

विसरेन देहभान, मी विसरेन देहभान
कापुन देइन मान, मी कापुन देइन मान
मातेला जगामध्ये देइन पहिले स्थान।। गाइन...।।

नुरविन कसली वाण, मी नुरविन कसली वाण
काढिन रुतले बाण, मी काढिन रुतले बाण
मातेला घालीन माझ्या हातांनी मी स्नान।। गाइन...।।

सर्वस्वाचे दान, करिन सर्वस्वाचे दान
घेतो आज आण, मी घेतो आज आण
मातेला घडविन माझ्या मोक्षामृतपान।। गाइन...।।

-धुळे तुरुंग, मे १९३२

मरणही ये तरी वरिन मोदे

मरणही ये तरी वरिन मोदे
जननिचे परि जगी यश भरु दे।। मरणही....।।

वीट वन्हित पडे
दृढ तरी ती घडे
तेज कष्टे चढे
हे कळू दे।। मरणही....।।

हाल होवोत ते
चित्त ना मुळि भिते
दास्य जे जाळते
नष्ट करु दे।। मरणही....।।

-अमळनेर, ऑगस्ट १९३१

   

पुढे जाण्यासाठी .......