बलसागर भारत होवो!
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो।।
बलसागर....।।
हे कंकण करि बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो।।
बलसागर....।।
वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यासि अर्पीन
हा तिमिर घोर संहरिन
या बंधु साहाय्याला हो।।
बलसागर....।।
हातात हात घेऊन
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।।
बलसागर....।।
करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।।
बलसागर....।।
या उठा करु हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।।
बलसागर....।।
ही मुक्त माय होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल
तो सोन्याचा दिन येवो।।
बलसागर....।।
हा देश वैभवी न्यावा!
जगदीश दयाघन देवा
हा देश वैभवी न्यावा।।
तू सुंदर मंगलमूर्ती
पुरवावी मनीची आर्ती
हे दीन धरावे हाती
तू सकळ सिद्धिचा ठेवा।। हा देश....।।
बलदाता तू मतिदाता
तू गणपती ऐक्य-विधाता
भयहर्ता तू सुखकर्ता
आम्हांस समयि या पावा।। हा देश....।।
तू कलह सकळ हे मिटवी
तू प्रेम आम्हांला शिकवी
तूत्याग तपस्या शिकवी
जनमनि न तिमिर उरवावा।। हा देश....।।
करु देत माय निज मुक्त
उठु देत सर्व सत्पुत्र
ते सकल निज समर्पोत
हा लोभ सकळ हटवावा।। हा देश....।।
जरि होइल भारत मुक्त
तरि होइल जग सुखभरित
पावेल विषमता अस्त
आनंद जगी पिकवावा।। हा देश....।।
-अमळनेर, ऑगस्ट १९३१
ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जरि मूठभर तरि ना भय
व्हा छातिचे ना बापुडे
व्हा सिंह व्हा नरपुंगव
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
खाऊ न केव्हाही कच
माघार शब्द न सापडे
कोशात बोला आमुच्या
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
सेवेत आत्मा ओतणे
मांगल्य-मोक्ष श्रीकडे
हा पंथ एकच जावया
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
स्वार्थी निखारा ठेवुनी
रमतो स्वकर्मी जो मुदे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
शिवते निराशा ज्यास ना
लोभाशि ज्याचे वाकडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
कर्मी अहोरात्र श्रमे
परि मान कीर्ति न आवडे
ते मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
न विलास घे, स्व-विकास घे
निंदादिके जो ना चिडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जे अंबरात उफाळती
ना लोळती शेणी किडे
ते मुक्त होती आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
सर्वत्र करि संचार जो
कोठेच काही ना नडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
करुनी महाकृतिही जया
अवडंबराचे वावडे
तो मुक्त होतो आयका
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
शिर घेउनी हातावरी
जो कर्मसमरी या लढे
करि माय अमरा तो निज
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
जरि व्हाल योद्धे संयमी
तरी मोक्षफळ हाता चढे
फाकेल भुवनी सु-प्रभा
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे।।
-नाशिक तुरुंग, जानेवारी १९३३