बुधवार, सप्टेंबर 22, 2021
   
Text Size

धडपडणारा श्याम

त्या ग्रंथालयातून मी वाचवण्यासाठी पुस्तके नेऊ लागलो. निरनिराळी चरित्रे वाचू लागलो. मी घरी पुस्तके नेत असे. घरी सर्वांच्या त्याच्यावर उडया पडत. कर्व्यांचे 'आत्मवृत्त' मी वाचले होते; परंतु त्या सर्व भावंडांनी वाचावे, म्हणून एके दिवशी मी मुद्दाम ते घेऊन आलो. रामला ते पुस्तक फारच आवडले. स्त्रियांच्या दास्याची रामला फार चीड येई. स्त्रियांवर जे सामाजिक अन्याय होत असतात, त्याबद्दल त्याला संताप येई. स्वातंत्र्याचा आनंद स्त्रियांना मिळाला पाहिजे, असे तेव्हापासून त्याला वाटे. कर्व्यांच्या त्या 'आत्मवृता'ने त्याच्यावर खूपच परिणाम झाला.

''आपण जर कधी लग्र केले, तर पुनर्विवाहच आपण करू,'' तो हसत म्हणायचा.
''काहीतरी काय बोलतोस?'' असे त्याची आई म्हणे. रामच्या त्या वरच्या हसण्याखाली, ह्दयात गंभीर भाव होता, हे त्या वेळेस कोणाला माहीत होते?

एकदा मी हिंगण्याला मावशीकडे गेलो होते. तेथे काही अध्यापकांकडे मी मावशीबरोबर गेलो. स्त्रियांच्या शिक्षणाचा अहोरात्र विचार करणारे व अकाली निधन पावलेले ते ध्येयवादी गो. म. चिपळूणकर हे त्या वेळेस तेथे होते. ते अमेरिकेतून नुकतेच आलेले. त्यांच्या खोलीत मावशीबरोबर मी गेलो. अमेरिकेतून आणलेले शेकडो फोटो त्यांच्याजवळ होते. मी फोटोसंग्रह पाहात बसलो.

हिंगण्याहून येताना मी दोन-तीन पुस्तके घेऊन आलो. 'जीविताचा उपयोग' व 'वक्तृत्वासाठी उतारे' ही दोन इंग्रजी पुस्तके आणि 'समर्थांचा दासबोध' अशी तीन पुस्तके मी घेऊन आलो. रामचा मोठा भाऊ अनंत 'दासबोध' वाचू लागला. मला आश्चर्य वाटले. त्याने सर्व 'दासबोध' संपवला. त्याला आवडलेले त्यातले भाग तो सर्वांना वाचून दाखवी. मीही तो वाचून काढला. त्यातली पंचीकरणाची प्रकरणे मला कंटाळवाणी वाटत; परंतु जेथे ठसठशीत संसारबोध आहे, तो भाग पुन्हा:पुन्हा वाचावासा वाटे.

माझ्या वडिलांनी एकदा मला पाकिटातून अडीच रूपयांची एक नोट पाठवली! त्यावेळेस एक रूपयाची व अडीच रूपयांची अशा नोटा सरकारने काढल्या होत्या. मी पाकीट फोडले, तर आतल्या पत्रात एक नोट! त्या पत्रात आणखीही एक वस्तू होती. त्या वस्तूची किंमत मला करता येत नव्हती. कोणती होती ती वस्तू? पत्रातले प्रेम? ते तर होतेच. पण प्रेमापेक्षाही थोर, असे काहीतरी मला वडिलांनी पाठवले होते.

त्यांनी तीन दूर्वा पाठवल्या होत्या! आमच्या पालगडच्या गणपतीच्या मूर्तीवरल्या त्या दूर्वा होत्या. गणपतीच्या उत्सवाचा प्रसाद मला पाठवता येत नव्हता; परंतु तो दूर्वाचा प्रसाद वडिलांनी आपल्या मुलाला पाठवला होता. वडिलांनी आपली शुध्द श्रध्दा त्या दुर्वादळांतून पाठवली होती. त्या दूर्वा मी मस्तकी धारण केल्या. त्या माझ्या अंगावरून फिरवल्या. जणू मंगलमूर्तीचे मंगल हातच माझ्या अंगावरून फिरत होते. मी जसा ध्यानस्थ झालो. क्षणभर डोळे मिटले.

''श्याम, काय रे आहे पत्रात? तुझ्या आईची प्रकृती बरी आहे ना?'' रामने विचारले.
''मधून-मधून ताप येतच आहे; परंतु 'काळजी करण्याचं कारण नाही,' असं त्यांनी लिहिलं आहे,'' मी सांगितले.
''मग तू असा का बसला आहेस?'' त्याने पुन्हा प्र९न केला.
''बघ, ह्यात काय आहे ते,'' मी त्याच्या हातात पत्र देऊन म्हटले.
''अडीच रूपयांची नोट आणि पाकिटातून! ळरवली असती तर, कुणी काढून घेतली असती तर?'' त्याने आश्चर्याने विचारले.
''अडीच रूपयाची नोट गेली असती, तरी त्याचं मला काही वाटलं नसंत; परंतु पत्रातली दुसरी वस्तू जर त्या वेळेस गहाळ झाली असती, नोट काढताना खाली पडली असती, तर मात्र माझं कमालीचं नुकसान झालं असतं,'' मी म्हटले.

 

पुढे जाण्यासाठी .......

धडपडणारा श्याम