रविवार, आँगस्ट 09, 2020
   
Text Size

धडपडणारा श्याम

प्रत्येकाच्या मनात कृतज्ञता असते. गाडीवानाने माझी भाजी घेतली. त्यालाही मग 'मला द्यावे' असे नाही का वाटणार? मी त्याच्याजवळून घेण्यासारखी वस्तुही जर घेतली नसती तर त्याच्या हदयाला नसते का दु:ख झाले? त्याने माझी भाजी नाकारली असती तर मला नसते का वाईट वाटले?

आपल्या खानदेशात एदलाबाद पेटयात अंतुर्ली वगैरे गावे आहेत. त्या अंतुर्लील मी एकदा गेलो होतो. त्या गावात जे वडार वगैरे लोक आहेत, ते ब्राम्हणाकडचे खात नाही. ते ब्राह्याणाला कमी मानतात! ते ऐकून मला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. जो स्वत:ला श्रेष्ठ समजून दुस-याला तुच्छ लेखतो, त्याला त्याचा मोबदला आज ना उद्या मिळाल्याशिवाय कसा राहील? जे आपण पेरतो, त्याची फळे भोगल्यावाचून सुटका नाही.

ती लसणीची चटणी तिखट लागत होती. तिच्यात भरपूर खोबरे वगैरे थोडेच घातलेले होते? ती गरिबाकडची चटणी होती. ती तिखट होती; परंतु मी गोड मानून खात होतो हाय-हुय सुध्दा मी केले नाही.

मी शेवटी कंरडीतले अंजीर खाल्ले. गाडीवानासही दोन दिले. हात तोंड वगैरे धुऊन आम्ही निघालो. गाडी जोरात सुरु झाली, मोठा घाट होता. उतार होता. दोहोकडे दाट झाडी होती. जरा भीषण व गंभीर देखावा होता.

''इथे दरोडे पडतात, रात्रीच्या वेळी गाडया लुटतात,'' गाडीवान म्हणाला.

''जागा भयंकरच आहे,'' मी म्हटले.

''दिवसा तसं काही भय नसतं,'' तो म्हणाला.

मी चोहोबाजूस पाहात होतो. घाट संपला पुढे एके ठिकाणी पीर होता.

''इथे भुताटकी होते,'' तो गाडीवान म्हणाला.

''खोटं आहे,''मी म्हणालो.

''लोक सांगतात,'' तो म्हणाला.

''आपण औंधला कधी पोचू?'' मी विचारले.

''दोन तरी वाजतील,'' तो म्हणाला.

''मला अगदी गावात घेऊन जा. मी नवीन आहे,'' मी म्हटले.

''तुम्ही काळजी नका करु. तुमच्या घराचा शोध लावू,'' तो म्हणाला.

मी पुन्हा जरा झोपलो. औंध जवळजवळ येत होते. औंधची टेकडी दिसू लागली. टेकडीवरचे यमाईचे देऊळ दिसू लागले.

'उठा, औंध आलं,'' गाडीवान म्हणाला.

मी एकदम उठलो.
''कुठे आहे?'' मी विचारले.

'' ती पहा टेकडी. तिथे यमाईचं देवळ आहे. आलंच आता औंध, औंधच्या महाराजांच हे दैवत आहे,'' तो म्हणाला.
गाडीवानाने यमाईला हात जोडले. मीही वंदन केले.

मी वंदन केलं; परंतु माझ्या डोक्याला टोपी नव्हती. मी माझी टोपी पाहू लागलो. माझी टोपी सापडेना. कोठे गेली माझी टोपी? सारी गाडी शोधली; परंतु ती गाडीत नव्हतीच, तर कोठून दिसणार?

''पडली वाटेत बहुधा,'' गाडीवान दु:खाने म्हणाला.

''माझ्या हातात होती! झोपेत हातामध्ये थोडीच राहाणार ? गेली, पडली,'' मी म्हटले.
माझे तोंड एकदम उतरले. तो मला अपशकुन वाटला. गाडीवानासही जरा बरे वाटले नाही. औंधला मी प्रथमच आलेला. मोठया आशेने, आकांक्षेने आलेला, परंतु आरंभीच जणू नाट लागला! डोक्यावर टोपी असणे म्हणजे मंगल व डोक्यावर टोपी नसणे म्हणजे अमंगल! काय हे संस्कार! जीवनावर असल्या सारहीन वस्तूंचा व चिन्हांचा केवढा परिणाम होत असतो! मांगल्य, अमांगल्य टोपीत का आहे? ते आपल्या हदयात आहे, विचारात आहे, कृतीत आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......

धडपडणारा श्याम