रविवार, आँगस्ट 09, 2020
   
Text Size

धडपडणारा श्याम

मोर हे सरस्वतीचे वाहन! किती योग्य व सहृद कल्पना! मानवी मनाचे हजारो नाच दाखविणारी देवी सरस्वती! ती दिव्य, भव्य पसारा पसरणा-या मयूरावर नाही बसणार, तर कोठे बसणार? मोराच्या पिस-यात ते हजारो डोळे लखलखत असतात. सरस्वतीही सहस्त्र नयनांनी मानवाच्या अंत:सृष्टीत पाहात असते आणि तेथे पाहिलेले सहस्त्र रंगांनी व रसांनी बाहेर ओतीत असते. मी लहानपणी पुण्यास मामांकडे असताना, तो बेलबागेतला पिंज-यातला दीन, दु:खी मोर पाहिला होता; परंतु असे झाडावर बसून केकारव करणारे स्वच्छंद मोर कधीच पाहिले नव्हते.

मित्रांनो काठेवाडात सर्वात अधिक मोर आहेत. काठेवाडातून रेल्वेने जात असताना आजूबाजूच्या झाडांवरुन मोरच मोर दिसतात. काठेवाडी कवींच्या काव्यातसुध्दा मोरांचे वारंवार उल्लेख येतात. थोर कवी कलापी ह्यांचे नावच मयूरभक्ती दाखवीत आहे. कलापी म्हणजे मोर!

आपल्या भारतीय संस्कृतीत मला हा एक विशेष दिसून येतो. मानवेतर सृष्टीतील नावे आपण आपल्या मुलाबाळांस ठेवीत असतो. फुलांची नावे इतर संस्कृतींतील माणसांनीही घेतली आहेत; परंतु फुलेच नाही तर झाडांची नावे, पक्ष्यांची नावे, पशूंची नावे, नद्यांची नावे, डोंगराची नावे आपण माणसांस ठेवीत असतो. स्वर्गातील रवी, शशी, तारे व पाताळातील नाग हयांचीही नावे आपणांस मोह पाडीत असतात. तुम्ही हसू नका. मी तुम्हाला उदाहरणे देतो.

जाई, शेवंती, अशोक, गुलाब, कमळ, कर्ण, चमेली, निशिगंध, सरोज, चंपक वगैरे फुलांची नावे मोठया प्रेमाने आपण ठेवीत असतो.

चंदन, बकुल, डाळिंब, तुळस वगैरे वृक्ष - वनस्पतींची नावे आपण माणसांस ठेवतो. कोकिळा, हंसा, चिमणी, मैना, पोपट, राघू वगैरे पक्ष्यांची नावे आपणांस प्रिय वाटतात. हरणी, रोहिणी, मनी, गजी, मातंग वगैरे प्राण्यांची नावे आपण घेतली आहेत. गौतम, वृषपर्वा वगैरे नावे प्राचीनकाळी प्रिय होती.

गंगा, यमुना, सिंधु, सरस्वती, कालिंदी, कावेरी,कृष्णा, गोदावरी, भीमा, चंद्रभागा, वारणा, शरयू, शरावती, सावित्री वगैरे नद्यांची नावे आपण शेकडो वर्षे मुलींना ठेवीत आलो आहोत. नद्याच केवळ नाही, तर केवळ पाण्याला जी नावे आहेत, तीही आपण ठेवीत असतो. अंबू, वारी,  जीवन ही नावे ठेवलेली आपणांस आढळून येतात.

काशी, द्वारका, माया, मथुरा, अयोध्या, वाराणसी, वगैरे थोर, पवित्र नगरांची नावे आपण मुलींना देत असतो.

चपला, चंचला, सौदामिनी, तारा, इंदू, शशिकला, चंद्री, भास्कर, प्रभाकर, दिवाकर वगैरे आकाशस्थ वस्तूंची नावे आपण घेतली आहेत. नागेश, शेषराय, अनंत ही सर्पाची नावे माणसांत आहेत.

आजूबाजूच्या सृष्टीचे हे अपार प्रेम आहे. सारी सृष्टी आपण आपल्या संसारात आणली आहे. हा संसार केवळ मानवांचा नाही. मानवाच्या संसारात सा-या सृष्टीतील सुंदरता व मंगलता येईल.

मी त्या मोरांकडे पाहात होतो. हिरव्या-हिरव्या झाडावर हिरवे-हिरवे मोर!
''श्याम, किती वेळ उभा राहणार?'' सखारामने विचारले; परंतु पुन्हा तोच म्हणाला, ''बघ बघ, तू कवी आहेस हे मी विसरलो.''

 

पुढे जाण्यासाठी .......

धडपडणारा श्याम