रविवार, आँगस्ट 09, 2020
   
Text Size

धडपडणारा श्याम

''मग माझा उपयोग काय? रात्रंदिवस हा प्रश्न मला टोचीत आहे. मला खाणं विषासम वाटतं! जगणं असहय होतं! मी का खावं प्यावं? मला अधिकार काय? ज्याला प्रामाणिकपणे वाटेल, की आपण केवळ भूभार आहोत, त्याने खुशाल आत्महत्या करावी. मी केवळ तुमच्या आसक्तीमुळे जगत आहे. माझी निरर्थकता तुम्हांला समजून, तुम्ही मला आनंदाने ह्या जगातून निघून जायला जर संमती द्याल, तर किती छान होईल? एखादा निरोगी भिकारी भीक मागताना आपण जर पाहिला, तर त्याच्यावर आपण रागावतो. तुम्ही त्याप्रमाणेच माझ्यावर रागावलं पाहिजे. जो नियम आपण इतरांस लागू करतो, तो आधी स्वत:च्या जीवनात व आपल्या प्रियजनांच्या जीवनातही आपण लावला पाहिजे; परंतु त्या वेळेस आपण मृदू मवाळ असतो. आपण परक्याच्या बाबतीत तत्वनिष्ठ असतो व स्वत:च्या बाबतीत तत्वहानी नि:शंकपणे करु देत असतो, म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत एके ठिकाणी लिहिलं की, 'अरे बाबा! तू दुस-याला स्वच्छ करायला फार धावतोस; परंतु थोडी स्वत:वर दया कर ना. दुस-याचे दोष फार बघतोस, थोडे स्वत:चे पाहून, ते दूर करु लाग ना.'

''नामदेव, खरंच माझ्या जीवनाचा मला वीट आला आहे. रात्रंदिवस वडवानळाप्रमाणे मला जाळणारी माझ्यातरी अशांती तुम्हाला दिसत नाही. माझ्या जगण्यामुळे तुम्हांला आनंद होतो, म्हणून मी जगत आहे; परंतु हा तुमचा आनंदा आसक्तिय आहे. माझं दु:ख तुम्ही का पाहात नाही? तुम्ही सारे स्वार्थी आहात. तुम्ही तुमच्या सुखासाठी माझ्या जीवनाची होळी मला विझवू का देत नाही. विझवू हे जीवन? होऊ दे निर्वाण! ह्या माझ्या भिकारडया जीवनाच्या दिव्याला देता का निरोप?''
नामदेव म्हणाला, ''जगण्याचं दु:ख होत असताही आमच्या सुखासाठी तू जगतोस, म्हणून तर तू आम्हांस हवास. दुस-यासाठी इतके मानसिक क्लेश जो वर्षानुवर्षे सहन करीत आहे, त्याचे पाय जन्मोजन्मी धरावे, असं मला वाटतं; आणि श्याम, एक गोष्ट तूच मागे सांगितली होतीस, की स्वत:ची खरी योग्यता स्वत:लाच समजते असं नाही. चित्रकार चित्र जवळ धरतो, दूर धरतो. दोन्ही रीतींनी धरुनच चित्राचं खरं स्वरुप समजतं. तू स्वत:ला जवळून पाहिलंस. आता दुरुन पाहा, म्हणजे आमच्या दृष्टीने पाहा. जगाच्या दूरच्या दृष्टीने पाहा. आम्ही जर म्हणत असू, की तुझं नुसतं जगणंच आम्हांला उपयुक्त आहे तर ते म्हणणं का खोटं? स्वत:च्या दृष्टीने तू नालायक ठरलास; परंतु जगाच्या दृष्टीने कुठे ठरला आहेस? स्वत:च्या दृष्टीने व जगाच्या दृष्टीनेही आपण नालायक ठरलो, तरीही कदाचित देवाच्या दृष्टीने आपण नालायक ठरले नसू. ज्या क्षणी देवाच्या दृष्टीने आपण नालायक ठरु, त्याच क्षणी आपला श्वासोच्छवास बंद होईल. एक क्षणभरही अधिक जगू म्हटलं, तरी जगता येणार नाही; आणि सृष्टीत तुमचा उपयोग आहे, असं जोपर्यत विश्वशक्तीला वाटत आहे, त्याच्या आधी तुम्ही कितीही मरु म्हटलंत, तरी तुम्ही मरणार नाही. श्याम, जगात कुणाला ना कुणाला तरी, आपला उपयोग थोडा फार होत असतोच असतो. जगात  आपण केवळ निरुपयोगी आहोत असं म्हणणं, म्हणजे जगच्चालकाचा तो अपमान आहे. साध्या किडयाचंही ह्या विश्वंयंत्रात काम आहे. शेवटी सहनशीलता गुणांची परीक्षा करते; तू लवकर वैतागतोस, निराश होतोस आणि त्यामुळे आम्हांला किती वाईट वाटतं!''

मी म्हणालो, ''तुम्हाला वाईट वाटतं, म्हणूनच माझा अस्त मला करु दे. माझ्या-सारखे निराशा पसवणारे प्लेगचे जंतू तुमच्यांत कशाला? इतरांना उत्साह देता आला नाही. तर निदान त्यांना स्वत:च्या दुबळया व भिकार विचारसरणीमुळे निरुत्साही तरी करु नये. माझ्या मनात हा विचार नेहमी येतो. घुबडाने दूरच राहावं; रानात निघून जावं. त्याचा भीषण धूत्कार इतरांच्या कानांवर त्याने का घालावा?''

 

पुढे जाण्यासाठी .......

धडपडणारा श्याम